कळवण : अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे झालेले नुकसान. Pudhari File Photo
नाशिक

Crops Damage in Nashik | साडेनऊ हजार हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान

सर्वाधिक नुकसान कांदा पिकांचे, 25 कोटींची गरज

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गत महिन्याभरापासून थैमान मांडलेल्या अवकाळीने जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ हजार हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी 25 कोटी 63 लाखांची गरज आहे. सटाणा, दिंडोरीत सर्वाधिक नुकसान कांदा पिकांचे, तर इगतपुरीत भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

7 मेपासून अवकाळीने राज्यासह जिल्ह्याला झोडपण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यात हाहाकार उडाला. सर्वत्र शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. बागायती पिकांचे नुकसान तर झालेच, पण खरिपाच्या पेरणीवरही अवकाळीमुळे संकट उभे राहिले आहे. गत महिन्याभरात अवकाळीने नुकसान केल्याने कृषिमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत बागायती पिकांचे एकूण साडेनऊ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अशा एकूण साडेनऊ हजार हेक्टर पिकांवर संक्रांत आली आहे. मे महिन्यात कांदा, भुईमूग आदी पिके काढणीला आली असताना अवकाळीने घाला घातला. अनेक ठिकाणी शेतकरी, गाई, बैल, म्हैस, बकर्‍या आदी पशुधनाचाही बळी गेला. कोट्यवधींचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सामान्य शेतकरीवर्गाकडून होत आहे.

अवकाळीने झालेले नुकसान

  • कांदा - 7557,

  • कांदा रोपे - 3.17,

  • मका - 393,

  • मिरची - 5,

  • टोमॅटो - 318,

  • बाजरी - 147,

  • भुईमूग - 117,

  • हरभरा - 117,

  • भाजीपाला - 933,

  • इतर फळपिके - 9.50

  • एकूण 9494.35

सटाणा, दिंडोरी, इगतपुरीत सर्वाधिक नुकसान

अवकाळीने सटाण्यात 3 हजार, दिंडोरीत पंधराशे, तर इगतपुरीत 1 हजार हेक्टर पिकांचे नुकसान केले आहे. यातही सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचे झाले आहे. काढणीला आलेला आणि चाळीत साठवलेल्या अशा एकूण 3 हजार हेक्टर कांद्याचे नुकसान झाले. तर दिंडोरी 1500 हेक्टर, तर इगतपुरीत 500 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पुढील आठवड्यात मान्सून धडकणार असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.

नुकसानभरपाई देण्यास 25 कोटींची गरज

जिल्ह्यात एकूण साडेनऊ हजार कोटींचे नुकसान झाले असून, साडेसात हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बागायती पिकांची नुकसानभरपाई देण्यासाठी 25 कोटी 63 लाखांची गरज असल्याचे कृषी विभागने जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.

बागायतीसाठी 27 हजारांची भरपाई मिळणार

अवकाळीने जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ हजार हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान केले आहे. एक एकरी बागायती पिकासाठी 27 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे कृषी विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार सुमारे 25 कोटींची गरज भासणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT