त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गत आठवड्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भाताचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याने ते हवालदिल झाले आहेत.
गत आठवड्यात कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उघडीप घेतली असली तरी अद्यापही पावसाळी वातावरण कायम आहे. परतीच्या पावसाचा जोर अधिक असल्याने शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने भात पिक कुजू लागले आहे. दिवाळी सणाला भाताच्या सोंगण्या सुरू होतात. मात्र, पावसामुळे त्या लांबल्या आहेत. भातासह भाजीपाला, भुईमुग, उडीद या पिकांचीही मोठी हानी झाली आहे. लाडकी बहिण योजेचे पैसे काहींना आले तर काहींना नाही. अशी एकूण अवस्था आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या वर्षी दिवाळीत रोख पैसा हाती मिळणार याची खुशी होती तथापि ती सार्वत्रिक नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यात हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. शासकीय यंत्रणा पंचनामे सुरू असल्याचे सांगत आहेत. मात्र, बहुतेक अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामाच्या तयारीत अडकले आहेत. साहजिकच वस्तुनिष्ठ पंचनामे होतील याची आपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राहिलेली नाही. त्यातही यापुर्वीच्या हंगामात झालेली हानी आणि त्यानंतर नुकसानभरापाई, पिक विमा भरपाई यासाठी नेहमीच दुय्यम स्थान मिळालेले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीवर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.