चांदवड : परतीच्या पावसामुळे द्राक्षबागांची होत असलेली फळकूज.  (छाया : सुनील थोरे)
नाशिक

Crop Damage : परतीच्या पावसाने द्राक्षबागेला फळकुजीची बाधा

Retreating Monsoon | बागायतदार संकटात, उत्पादन घटण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : तालुक्यातील द्राक्षबागांना परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे फळकूज व घडकूज सुरू झाली आहे. खराब वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पाऊस पडल्यावर लगेचच औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे अतिरिक्त आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. फळकूज मोठ्या प्रमाणात असल्याने ३० ते ४० टक्के द्राक्षबागांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Vineyards have been hit hard by the poor weather caused by the return rains)

चांदवड तालुक्यात निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन होत असते. सप्टेंबर महिन्यात बहुतेक सर्व द्राक्ष उत्पादक बागांची छाटणी करतात. त्यानंतर द्राक्षांना घड येण्यास सुरुवात होते. यंदा हवामान चांगले असल्याने द्राक्षांचे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. मात्र, गेल्या १० ते १२ दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या पावसामुळे द्राक्षबागांना लागलेले घड कुजत आहेत. यासाठी महागडी औषधे फवारणी करावी लागत असली तरीदेखील फळकूज थांबत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. असाच पाऊस होत राहिल्यास द्राक्षबागांचा हंगाम वाया जाण्याच्या शक्यतेने बागायतदार धास्तावला आहे.

द्राक्ष घडकूज उपाययोजना

योग्य घडांची संख्या, वापसानुसार पाणी नियोजन, वेळेवर शेंडा पिंचिंग करणे, पाऊस झाल्याने बागेत साठणारे पाणी बाहेर काढणे, घडात पाणी साठू नये म्हणून वेली झटकणे अथवा ब्लोअरने हवा मारणे, संजीवकांचा सुयोग्य वापर, बागेत चांगला सूर्यप्रकाश येण्यासाठी फेल काड्या व काडीच्या खालची पाने काढावीत, मॅग्नेशियम व बोरॉन व पोटॅशची फवारणी, वेलीला ताण येऊ नये म्हणून अँटिस्ट्रेसची फवारणी (सिलिकॉन, इसाबीयॉन), पोस्ट ब्लूम स्टेजमध्ये (२७ - ३० दिवसांदरम्यान) सिलिकॉनची फवारणी करावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांकडून दिला जात आहे.

परतीच्या पावसामुळे द्राक्षबागांची फळकूज मोठ्या प्रमाणात होत आहे. फळकूज थांबण्यासाठी अतिरिक्त औषधांची फवारणी करावी लागतेय. तरीदेखील फळकूज नियंत्रणात येत नसल्याने उत्पादनात घट होऊ शकते.
तुषार बोरसे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, नाशिक.
गत आठवड्यापासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा द्राक्ष, कांदा, सोयाबीनसह इतर पिकांना फटका बसला आहे. द्राक्षबागांची फळकूज होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहे. या बागांचेदेखील पंचनामे करण्याच्या सूचना कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांना दिल्या आहेत.
नीलेश मावळे, तालुका कृषी अधिकारी, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT