नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने जाहीर केली असून, नाशिक विभागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ पंचनामे पूर्ण करत कार्यवाही पूर्ण केली. यात विभागात तब्बल ११ लाख ५० हजार ३०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यासाठी १,४७४ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
राज्याला तब्बल ३,२५८ कोटी ५६ लाख ४७ हजार इतकी मदत मिळाली आहे. त्यात विभागात सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्याला फटका बसल्याने ८४६ कोटी ९६ लाखांची मदत जाहीर झाली. त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ३१७ कोटी, जळगावला २९९ कोटी, धुळ्याला १० कोटी रुपयांची मदत जाहीर झाली. सर्वात कमी नंदुरबार जिल्ह्याला सुमारे ५४ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.
शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत अल्प आहे. शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश वाढेल.राजू देसले, किसान सभा, राज्य अध्यक्ष
अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यांत शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांची दिवाळी कशी जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शासनाने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी भरपाई जाहीर केली आहे. ही रक्कम खात्यात कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.