नाशिक रोड: केंद्रातील मोदी सरकार अंबानी-अदानींचे रक्षण करत आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे बेरोजगारी वाढली आहे. पेन्शन बंद आहे. शिक्षण व रोजगाराचा अभाव यामुळे सामान्य जनतेला अंधारात ढकलले असल्याचा आरोप करत भाकप राष्ट्रीय सचिव व आयटकच्या महासचिव अमरजित कौर यांनी जोरदार भाषण करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. (Communist Party of India (CPI) Nashik)
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत असल्याने शतक महोत्सवी वर्षानिमित्त भाकपचे २५ वे राज्य अधिवेशन नाशिकमध्ये सुरू झाले. यात उद्घाटक कॉ. अमरजित कौर उपस्थित होत्या. यावेळी भालचंद्र कानगो यांची अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. मंचावर कॉ. महादेव खुडे, ऍड. सुभाष लांडे, स्मिता पानसरे, राजू देसले, भालचंद्र कांगो, डॉ. तुकाराम भस्मे, शिवकुमार गणवीर, सुकुमार दामले, प्रकाश रेड्डी, एम. ए. पाटील, श्याम काळे, राम बाहेती, तल्हा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
अमरजित कौर यांनी जोरदार भाषण करत सरकारवर हल्लाबोल केला. महिला रॅलीमध्ये जीवनावश्यक मागण्या मांडत आहेत. त्या मानवी हक्क आहेत. ते पूर्ण करणे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा दावा करताना त्यांनी भाकप पक्ष हा कायम धनाड्यांविरुद्ध असून तो समाजहित व सर्वसामान्य समाजाच्या बाजूने उभा राहणार असल्याचे स्पष्ट केले. भाजप सरकार हिंदू- मुस्लिम भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाकप पक्ष हा एकोप्याची भूमिका स्पष्ट करतो. भाकप पक्ष सरकारच्या विरोध होता आणि राहील. भाजप सरकार युद्धाची मानसिकता रुजवत आहे, जेणेकरून शस्त्र खरेदीतून धनाढ्यांना फायदा होईल. मात्र लाल झेंडा ही शांतीची आणि समतेची भूमिका मांडतो,” असे दावा त्यांनी केला.
अध्यक्षीय भाषणात कानगो यांनी सांगितले की, सध्याच्या राजवटीत शांत बसून चालणार नाही. व्यापक आंदोलन आणि ठाम भूमिका घ्या. पक्ष संघटन मजबूत करा, आणि खऱ्या प्रश्नांवर संघर्ष वाढवा. ३० जूनला सर्व पक्षीय आंदोलन होणार असून ९ जुलै रोजी शेतकऱ्यांचा भारत बंद पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनाचा दुसरा आणि तिसरा दिवस देखील विविध सत्र, कार्यशाळा व ठरावांसह पार पडणार असून राजकीय ठराव मांडण्यात येणार आल्याचे राजू देसले यांनी सांगितले. यावेळी गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांचा सत्कार करण्यात आला. तल्हा शेख यांनी आभार प्रदर्शन केले.
अधिवेशनाची सुरुवात लाला झेंडे हातात घेऊन काढण्यात आलेल्या रॅलीने झाली. हजारो कार्यकर्त्यांनी “मार्क्सवाद जिंदाबाद”, “लाल सलाम , लाल सलाम “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी नाशिकच्या रस्त्यांवर लाल लाट निर्माण केली. शतक महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईनाक्स ,द्वारका सर्कल ते श्रीकृष्ण लॉन्स दरम्यान दुचाकी, चारचाकी आणि पायदळ रॅली काढण्यात आली. या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.