पिंपळगाव बसवंत (नाशिक) : शहरातील अंबिका नगर औद्योगिक वसाहतीत कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या दोन गुन्हेगारांना पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करून कठोर कारवाई केली. पोलिसांनी या गुंड प्रवृत्तीच्या संशयितांची शहरातून धिंड काढून गुन्हेगारांना पिंपळगावमध्ये आश्रय नाही असा संदेश दिला.
औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी हातात कोयता घेऊन कामगारांना धमकावले होते. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. घटनेची दखल घेत पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला.
गुन्हेगारीला आमच्या हद्दीत कोणत्याही प्रकारे वाव दिला जाणार नाही. परिसरात गुंड प्रवृत्तीचे आणखी काही इसम असल्याची माहिती आमच्याकडे आहे. जो कोणी दमदाटी करेल, गुन्हेगारीला खतपाणी घालेल त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.प्रदीप देशमुख, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत
गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरीचे प्रकार वाढत असल्याने कामगार वर्गात भीती होती. पण पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. अशाच पद्धतीने कठोर कारवाई होत राहिली तर परिसर सुरक्षित बनेल.उद्धव शिंदे, रहिवाशी, अंबिकानगर
पोलिसांनी अंबिका नगर परिसरातून नीलेश अंबादास डंबाळे (30, रा. पांडाने, ता. दिंडोरी) आणि राहुल उर्फ पप्या राऊसाहेब जाधव (20, रा. अंबिका नगर, पिंपळगाव बसवंत) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून धारदार कोयता जप्त करण्यात आला. या दरम्यान पोलिसांनी परिसरात धिंड काढून कायद्याचा धाक निर्माण केला. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले, पोलिस कर्मचारी विकास वाळुंज, गोकुळ खैरनार, सागर धात्रक, अमोल देशमुख आदी सहभागी होते.