नाशिक : कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली असून, शहरात पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आठवडाभरापूर्वी माजी खासदार हेमंत गोडसे यांना कोराेनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर हा आकडा पाचवर गेला आहे. दरम्यान, या रुग्णांना सौम्य लक्षणे असून, त्यातील दोघांनी कोरोनावर मात केली आहे. तर उर्वरित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोना महामारीचा काळ आठवल्यास अंगावर शहरा येतो. अशात पुन्हा एकदा देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने, चिंतेत भर पडत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांत सातत्याने कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहे. दरम्यान, नाशिकमध्येही आता रुग्णसंख्या वाढत असल्याने, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गत आठवड्यात माजी खासदार गोडसे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत उपचार सुरू केले होते. मात्र, त्यानंतर पाच नवे रुग्ण समोर आले आहेत. या रुग्णांना सौम्य लक्षणे असली, तरी त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेकडून विशेष लक्ष दिले जात आहे. रुग्णांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून, खासगी लॅबमध्ये केलेल्या चाचण्यांमधून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोघांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, तिघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
झाकीर हुसेन रुग्णालय तसेच ठाकरे रुग्णालयात स्वतंत्र कोरोना कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच लॅब व खासगी रुग्णालयात कोरोनासदृश रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला सूचित करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत आरोग्य विभागाने आयएमए, निमा आणि जनरल प्रॅक्टिशनर्स संघटनेला पत्र लिहिले असून, संशयित रुग्णांसह बाधितांचा आकडा दररोज कळविण्याचे बंधनकारक केले आहे.
आढळून आलेल्या पाचही रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. मात्र, काळजी घेणे तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका नाशिक.