नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून तब्बल 15 कोटी रुपये खर्चून रामवाडीलगत उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी गोदापार्कच्या संचलनासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनदेखील ठेकेदार मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने गोदापार्कच्या रॉयल्टीच्या रकमेत कपात करत तिसर्यांदा फेरनिविदा मागविण्याची तयारी केली आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून नाशिकमध्ये 52 प्रकल्प हाती घेण्यात आले होते. यापैकी 20 प्रकल्प प्रत्यक्ष स्मार्ट सिटी कंपनीमार्फत, तर उर्वरित प्रकल्प सीएसआर निधीतून राबविण्यात आले आहेत. 20पैकी 17 प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून, अद्यापही तीन प्रकल्पांची कामे अपूर्ण आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीची मुदत 31 मार्चअखेर संपुष्टात आल्याने पूर्ण झालेले प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पंचवटीतील रामवाडीलगत उभारण्यात आलेल्या 600 मीटर लांबीचा गोदापार्क स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली होती.
या कामाच्या मूळ नस्ती तथा एमबी फाइल्स, कामांचे टेस्टिंग रिपोर्ट, ठेकेदाराबरोबर झालेला करार, निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती व एकूणच प्रक्रियेशी संबंधित सर्व दस्ताऐवज स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेकडे सादर केल्यानंतर या प्रकल्पाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रकल्पाच्या संचलनासाठी महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाकडे पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने प्रकल्प संचलन खासगी एजन्सी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनदेखील ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
गोदापार्क संचलनासाठी दरमहा 1.80 लाख रुपये रॉयल्टी रक्कम निश्चित करण्यात आली होती. एकच निविदा प्राप्त झाल्याने दुसर्यांदा फेरनिवदा मागविताना रॉयल्टी रक्कम 1.30 लाख करण्यात आली होती. परंतु, दुसर्यांदाही केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्या. त्यामुळे तिसर्यांदा फेरनिविदा प्रक्रिया राबविताना रॉयल्टी रकमेत आणखी कपात करण्यात आली असून, आता दरमहा एक लाख रुपये रॉयल्टी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम ठेकेदाराकडून वसूल केली जाणार आहे. त्या बदल्यात ठेकेदार गोदापार्कला प्रवेशशुल्क व बोट सफरीसाठी शुल्क आकारणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी गोदापार्क प्रकल्पाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाच्या संचलनासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक