नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी देशातील मिठावर नियंत्रण आणले होते. त्याप्रमाणे अमेरिकेचा आपल्या देशातील इंधनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महात्मा गांधींनी केलेल्या दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह याचे स्मरण करा आणि राज्यकर्त्यांनी अमेरिकेच्या इशाऱ्यावर इंधनावर आणलेले नियंत्रण झुगारून लावा, अशी हाक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारविरोधात लढणे, पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच काँग्रेसचा विचार अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी (दि.१२) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित लोकप्रतिनिधी कार्यशाळेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, शरद आहेर, अॅड. सचिन नाईक, राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सरचिटणीस गुरबचन बच्छर, प्रभारी ब्रिज दत्त, श्रुती म्हात्रे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडाळ, प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्य कारभार करत आहे, ही हुकूमशाही संपुष्टात आणली पाहिजे. सरकार हे लोकशाही व संविधानानुसार चालले पाहिजे, काँग्रेस पक्षाने याच मूल्याने कारभार केला. आज लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.
भाजपाच्या सत्ता, संपत्ती व अहंकाराच्या बुलडोझर समोर काँग्रेसचा कार्यकर्ता निर्धाराने लढला. सरकारी यंत्रणा व पैशाचा वारेमाप वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप लढला. इंग्रजाविरोधात स्वातंत्र्यसैनिक लढले त्याच त्वेषाने काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता लढला. जे यश मिळाले ते वाखण्याजोगे आहे.
हा लढा असाच पुढे सुरू ठेवायचा आहे आणि पक्षासाठी कटिबद्ध होऊन संघटनेसाठी काम करा, पक्षाला गतवैभव नक्की प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले. शिबिर कशासाठी आहे व त्याचा पदाधिकाऱ्यांना काय फायदा होईल हे सांगून जनतेशी संवाद साधा, असे आवाहन थोरात यांनी केले. अॅड. पाटील यांनी प्रस्तावना केली. काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली ध्वजारोहण झाले.
आज समारोप
गुरुवारी दिवसभर झालेल्या सत्रात सचिन सावंत, हनुमंत पवार, विक्रम खोपडे यांनी मार्गदर्शक सूचना केल्या तसेच पदाधिकारी व उमेदवारांची व पदाधिकारी यांची ओळख करून घेतली. संग्राम खोपडे यांनी 'शहरी राजकारण' या विषयावर मार्गदर्शन केले.
आरटीई कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी 'माहिती अधिकाराचा वापर कसा करायचा' यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आशुतोष शिर्के, अॅड. सचिन नाईक यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. शुक्रवारी शिबिराच्या सांगता समारोप होणार आहे. यात बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.