rajabhau waje pankja munde
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची समाज माध्यमांवरील पंकजा मुंडेंचे अभिनंदनाची पोस्ट चांगलीच चर्चिली जात आहे pudhari news network
नाशिक

ठाकरे गटाचे खासदार वाजे यांच्याकडून पंकजा मुंडेंचे अभिनंदन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बीड जिल्ह्यातील परळीसह सिन्नरमध्ये एकच जल्लोष केला. समर्थकांनी गुलालाची उधळण करीत, फटाक्यांची आतषबाजी केली. मात्र, या सर्व जल्लोषात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची समाज माध्यमांवरील पोस्ट चांगलीच चर्चिली जात आहे. होय, ठाकरे गटाचे खासदार असलेल्या वाजे यांनी भाजपच्या मुंडे यांचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे सिन्नर तालुक्यातील राजकीय गणितांवर आता चर्चा रंगत आहे.

खासदार वाजे यांनी पक्षभेद बाजूला सारत आपल्या फेसबुक अकाउंटवरून पंकजा मुंडे यांचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहेत. तत्पूर्वी त्यांनी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या निवडीबद्दल पोस्ट शेअर केली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्या अभिनंदनाची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत असून, त्यांच्या या पोस्टला विविध राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. सिन्नर विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या मतदारसंघात मराठा आणि ओबीसींचे मोठे प्राबल्य असून, गेली अनेक वर्षे वंजारी समाज खासदार वाजे यांच्याबरोबर असल्याचे बोलले जाते. गेल्या लोकसभा निवडणूकीतही सिन्नर तालुक्यातील मराठा आणि ओबीसींची मोठी ताकद खासदार वाजे यांच्या पाठीशी राहिल्याने, त्यांना सिन्नरमधून विजयी आघाडी घेणे शक्य झाले. या सर्व बाबींचे संदर्भ खासदार वाजे यांच्या पंकजा मुंडे यांच्या अभिनंदनाच्या पोस्टशी जोडले जात आहेत.

आगामी विधानसभा अन् चर्चेतील पोस्ट

सिन्नर मतदारसंघात प्रारंभी गोपीनाथ मुंडे यांना आणि आता पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या समर्थकांची संख्या मोठी आहे. मुंडे कुटुंबीयांचे हे समर्थक प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरत असतात. मुळात सिन्नरमध्ये पक्षीयभेद बाजूला सारून सत्ताधारी आणि विरोधक अशाप्रकारे निवडणुकीला कौल दिला जात असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पक्षीय विचार बाजुला सारून समर्थकांना आपल्या बाजूने ओढण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा यानिमित्त होत आहे.

SCROLL FOR NEXT