नाशिक : मनमाड - इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. याबाबत मध्य रेल्वे (भुसावळ)चे उपमुख्य अभियंता (निर्माण) यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना विनंती केली होती. त्यानुसार सक्षम प्राधिकारी नियुक्त झाल्यामुळे येत्या काळात संबंधित गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया गतिमान होणार आहे.
सध्या मनमाड - इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पाचे मध्य प्रदेशातील काम अंतिम टप्प्यात आले असून, आता महाराष्ट्रातील धुळे आणि मालेगाव तालुक्यांतील भूसंपादन प्रक्रियेलाही वेग येणार आहे. आगामी काळात नांदगाव तालुक्यातील सहा आणि मालेगाव तालुक्यातील १५ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला मनमाड - इंदूर रेल्वे मार्ग आता खर्या अर्थाने दृष्टिपथात येत आहे.
रेल्वे अधिनियम 1989 (1989 चा क्र. 24) व त्यातील 2008 च्या सुधारित तरतुदींनुसार मनमाड ते नवीन धुळे आणि नरडाणा ते डॉ. आंबेडकरनगर या दरम्यान प्रस्तावित 309.43 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, पांझणदेव, खाटगाव, नवसारी व भाडी या सहा, तर मालेगाव तालुक्यातील चोंढी, जळगाव, काळेवाडी, घोडेगाव चौकी, वऱ्हाणे, मेहुणे, ज्वार्डी बुद्रूक, येसगाव, सवंदगाव, सायने बुद्रुक, माल्हणगाव, चिखलओहोळ व झोडगे यांसह १५ गावांमध्ये भूसंपादन होईल, त्यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी होणार आहे.