नाशिक : निखिल रोकडे
पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेल्यावर उर्मट वागणूक, वेळकाढूपणा आणि कडक भाषेचा अनुभव येणे हे नवीन नाही. मात्र, आता नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यांतून नागरिकांना वेगळाच अनुभव येत आहे. तुम्ही तक्रार दिल्यानंतर, 'तुमचे काम झाले का? समाधान झाले का?' असा फोन थेट पोलिसांकडून येत आहे. विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील ४० पोलिस ठाण्यांत ही यंत्रणा सुरू केली आहे.
सरकारी कार्यालये म्हटली की, नागरिकांना त्रास होतो, ही सर्वसाधारण भावना. पण जर तोच अनुभव पोलिस ठाण्यात मिळाला, तर परिस्थिती अधिकच कठीण होते. तक्रारीसाठी थांबावे लागते, उलट प्रश्नांना सामोरे जावे लागते, कधी कधी उग्र बोलणेही ऐकावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे. मात्र, खाकी वर्दीतील अधिकारी आणि कर्मचारी हेही समाजाचा भाग आहेत. त्यांना भावना आहेत, ते तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करतात, ही जाणीव नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
नाशिक ग्रामीणचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनीच 'रिस्पॉन्स सिस्टीम' लागू करण्याची भूमिका मांडली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील ४० पोलिस ठाण्यांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. आता नागरिक जेव्हा तक्रार देण्यासाठी किंवा अन्य कामासाठी पोलिस ठाण्यात जातात, तेव्हा २४ तासांच्या आत त्यांना संबंधित ठाण्यातून फोन केला जातो. दिलेल्या तक्रारीवर कारवाई झाली का किंवा जे काम घेऊन ते आले होते ते पूर्ण झाले का, याची चौकशी केली जाते. जर तसे झाले नसेल, तर तातडीने संबंधित पोलिस ठाण्याला निर्देश दिले जातात
पोलिस ठाण्यामध्ये आल्यानंतर नागरिकांना योग्य वागणूक मिळावी, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे कारण पोलिस हे जनतेचे सेवक आहे. यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनीही पोलिस विभागाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये तक्रार निवारणासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी कार्यालयातून फोन आला, आपल्या तक्रारीबद्दल आपणास काही प्रतिसाद मिळाला का? संबंधित पोलिस ठाण्यामधून मला संपर्क केला गेला होता. असा अनुभव सर्वसामान्य नागरिक म्हणून मला प्रथमच आला याबद्दल पोलिस अधीक्षकांचे आभार.तक्रारदार
यामुळे पोलिस आणि नागरिकांमधील संवाद सकारात्मक होत असून, पोलिस खात्याबद्दलची प्रतिमा बदलण्यास मदत होत आहे. नागरिकांचा अनुभव फक्त तक्रारीच्या निकालावर ठरत नाही, तर त्यांना मिळालेल्या वागणुकीवरूनही त्यांचे मत तयार होते. या नवीन उपक्रमामुळे नाशिक ग्रामीण पोलिस विभागाबद्दल नागरिकांमध्ये समाधान व विश्वास निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.