birth and death registration file photo
नाशिक

दिलासादायक! जन्म-मृत्यू दाखला मिळणार आता तीन दिवसात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी आता महिनाभर प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नाही. विहित नमुन्यात अर्ज भरल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच अर्जदाराला दाखल्याची प्रत मिळणार आहे. लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांबाबत महापालिकेने अधिसूचना जारी केली असून अधिसूचित सेवांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पूर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क २०१५ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार विहित नमून्यात अर्ज भरल्यानंतर जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा व थकबाकी नसल्याचा दाखला ३ दिवसातच मिळणार आहे.

राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरीता तसेच स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पूर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क २०१५ लागू करण्यात आला आहे. या अध्यादेशातील कलम ३ मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अध्यादेश लागू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत आणि त्यानंतर वेळोवेळी ते पुरवित असलेल्या लोकसेवा, त्यासाठी पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलिय अधिकारी आणि सेवापूर्तीसाठी नियत कालमर्यादा या अध्यादेशाखाली अधिसूचित करणे आवश्यक आहे.

त्यासंदर्भातील ७ जुलै २०१५च्या शासन निर्णयानुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून १५ लोकसेवा अधिसूचित केल्या आहेत. त्याचप्रमाणे ४ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार मालमत्ता करासंदर्भातील १२ सेवा, पाणीपुरवठा वसुली संदर्भातील १४ सेवा, ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात २ सेवा, व्यवसाय परवाना संदर्भात १० सेवा अधिसूचित केल्या आहेत. त्यानुसार विहित नमून्यात अर्ज भरल्यानंतर जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता कर उतारा व थकबाकी नसल्याचा दाखला ३ दिवसात मिळणार आहे. मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र, वारसाहक्काने हस्तांतरण नोंद प्रमाणपत्राकरीता १५ दिवस, झोन दाखल्यासाठी ७ दिवस, बांधकाम परवान्याकरीता दोन महिने, भाग नकाशा ३ दिवस, जोते प्रमाणपत्र १५ दिवस, भोगवटा प्रमाणपत्र एक महिना, नळ व मलनिस्सारण जोडणी १५ दिवसात, अग्निशामक ना हरकत दाखला ७ दिवस तर अग्निशामक अंतिम ना हरकत दाखला १५ दिवसात दिला जाणार आहे. या सेवांकरीता विहित शुल्क आकारले जाणार आहे.

घरपट्टी १५ दिवसात लागू होणार

नवीन मिळकतींवर घरपट्टी कर आकारणी अर्ज भरल्यानंतर १५ दिवसात केली जाणार आहे. पुन:कर आकारणी, मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र, स्वयंमूल्यांकन, आक्षेप नोंदविणे, उप विभागात मालमत्ता विभाजन, मालमत्ता पाडणे व पुन: बांधणी कर आकारणीसाठी १५ दिवसांचा कालावधी असणार आहे. त्याशिवाय कराची मागणी पत्र तयार करणे, थकबाकी नसल्याचा दाखला, मालमत्ता कर उतारा, आदी सेवा तीन दिवसात देण्याचे बंधन आहे. नव्याने नळजोडणी, नळ जोडणी आकारात बदल, पुन: जोडणी या सेवाही १५ दिवसात दिल्या जाणार आहेत.

मनपाकडून घ्यावा लागणार व्यवसाय परवाना

महापालिका हद्दीत व्यावसाय करण्यासाठी आता महापालिका कार्यालयात विहित शुल्क भरून परवाना घ्यावा लागणार आहे. व्यावसायासाठी नवीन परवाना मिळणे, परवान्याचे नुतनीकरण, परवाना हस्तांतरण, परवाना दुय्यम प्रत, व्यवसायाचे नाव बदलणे, व्यवसाय बदलणे, परवानाधारक, भागीदाराचे नाव बदलणे, भागीदारांच्या संख्येत वाढ अथवा कमी करणे यासंदर्भातील सेवांसाठी १५ दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. व्यापार, व्यावसायाकरीता ना हरकत प्रमाणपत्र, मंडप उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र सात दिवसात दिले जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT