पंचवटी : विकासकामांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, दादा भुसे, ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, प्रवीण गेडाम आदी.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

CMO Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

रामकाल पथसह पायाभूत सुविधांत होणार दर्शनी भागांचा विकास

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी (नाशिक) : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून 'स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेसमेन्ट' योजनेंतर्गत ९९ कोटी १४ लाख रुपये खर्चातून रामकुंडासह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथसह पायाभूत सुविधांत होणाऱ्या सुधारणा व दर्शनी भागांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे उपस्थित होते.

नाशिक : रामकाल पथाबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देताना मनपा आयुक्त मनीषा खत्री

मुख्यमंत्री फडणवीस आल्यानंतर लक्ष्मण पूल येथे ठेवण्यात आलेल्या श्री रामकाल पथचे संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाच्या कामाविषयी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांना माहिती दिली. त्यानंतर लक्ष्मणकुंड परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर कुदळ मारत भूमिपूजन पार पडले. यानंतर भूमिपूजन सोहळा कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग, रामकाल पथावरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांत सुधारणा करण्यात येणार आहे. रामकुंड, सीतागुंफा, काळाराम मंदिर, राम-लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचा विकास होणार आहे.

कार्यक्रमास पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल व अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी पौरोहित्य केले. योगेश कमोद यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रशासनातील विविध अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT