त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबकनगरीत येणाऱ्या भाविकांना पावित्र्याची अनुभूती मिळावी आणि शहराचे रूपांतर सक्षम, स्वच्छ व नियोजनबद्ध नगरीत करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे विरोधक पसरवत असलेल्या घरे, दुकाने तोडण्याच्या अफवा खोट्या असून, कोणालाही विस्थापित न करता विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ त्र्यंबकेश्वरातून करण्यात आला. सोमवारी (दि. २४) मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुशावर्त दर्शनानंतर जव्हार रोडवरील सभेत हजेरी लावली. व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती आदी मान्यवर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. सिमेंटच्या रस्त्यांसह घाट, पार्किंग यांसारखी पायाभूत सुविधा उभारल्या जात असून, नुकसान झाल्यास नागरिकांना योग्य मोबदला दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग असल्याने नगरीची पवित्रता अधिक जपण्याची गरज व्यक्त केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक येणार असल्याने शहर सर्वंकष तयार ठेवण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्र्यंबकेश्वरला २४ तास पाणीपुरवठा, खड्डेविरहित रस्ते आणि स्वच्छतेच्या सक्षम सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कुंभमेळ्याच्या नियोजनात साधू-महंतांचा सहभागही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास घुले (त्र्यंबकेश्वर) आणि मधुमालती मेंद्रे (इगतपुरी) यांच्यासह प्रभागातील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. कैलास घुले यांनी आभार मानले.