नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | मुंबई, नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी अपेक्षेपेक्षा मंदगतीने सुरू आहे, तरीही येणाऱ्या आव्हानांवर मात करु असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.23) रोजी सांगितले. नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांनी कुंभमेळाच्या तयारी संदर्भातील आढावा घेतांना सांगितले.
नाशिक येथील सीआयआय यंग इंडियन्स आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळाबाबत येणाऱ्या आव्हानांची कबुली दिली पण त्यासोबतच आव्हानांवर मात करण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, पायाभूत सुविधांचे काम हे वेळेच्या तुलनेने मागे असले तरी परिस्थिती सुधारत आहे. "आम्ही गेल्या वर्षी कुंभमेळ्याची तयारी सुरू केली, मात्र जर आम्ही 2020 पासूनच काम सुरू केले असते तर आज अधिक चांगली स्थितीत असतो," असे ते म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितले की, प्रयागराजमधील यशस्वी कुंभमेळ्याच्या अनुभवातून काही पुढील तयारी केली जात आहे. "2015 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा भरला होता, यावेळी, आम्ही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी सुरू असलेल्या यशस्वी प्रयत्नांच्या समान मॉडेलकडे पाहत आहोत," असे ते म्हणाले.
नाशिकमधील कुंभमेळा हा "श्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा कुंभ" असे म्हणता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन तसे व्यवस्थापन करणे आणि व्हर्च्युअल रिॲलिटी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांच्या समावेशाबाबत त्यांनी प्रकाश टाकला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांना एका अनोख्या, तल्लीन करणारा अनुभव या कुंभमेळ्यात होईल याची हमी मुख्यमंत्री यांनी दिली.
फडणवीस यांनी सांगितले की, "हा सिंहस्थ कुंभमेळा हा एकूण 300 एकर क्षेत्रावर होणार असून तो प्रयागराजच्या 7,500 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत लहान असला तरी भव्य आणि प्रभावी अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असेल." या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला साधू आणि ऋषींच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेतले. परिसराची पाहणी केली. त्र्यंबकेश्वरचा विकास आरायखडा तयार केला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे. देशभरातील लोक तिथे येतात. कॉरिडॉर तयार करणे, पार्किंग, शौचालय तयार करणे, तिथले मंदिरे आणि कुंडाची दुरूस्ती करणे. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्ध राहिले पाहिजे, या दृष्टीने एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी त्याचे काम पूर्ण करायचे, असा प्रयत्न केला जाणार आहे. या कामाला खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून निर्णय घेतला की, कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही. त्यामुळे कामांसाठी आवश्यक निधी आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
त्र्यंबकच्या साधू संतांनी मागणी केली आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कुंभमेळ्याची जबाबदारी घ्यावी, असे विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहेच. परंतु, उत्तर प्रदेशने ज्याप्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि कुंभमेळा प्राधिकरण तयार केले आहे. त्याच धर्तीवर आपणही कायदा तयार करत आहोत. कुंभमेळा प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर चौकट देत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच कुंभमेळ्याचा उल्लेख नाशिक-त्र्यंबक कुंभमेळा असा करावा, अशी मागणी साधू महंतांनी केली. याबाबत फडणवीस म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबक अशा दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो. नाशिक ही पुण्यनगरी असून त्र्यंबकेश्वरचे महत्व देखील अनन्यसाधारण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही एकत्र असलेले शिवलिंग त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचा दर्जा अत्यंत वरचा आहे. त्यामुळे ही मागणी पूण करू, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.