मुख्यमंत्री फडणवीस  (Pudhari File Photo)
नाशिक

CM Fadnavis on Nashik Visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये

भाजपच्या विभागीय बैठकीस हजेरी लावणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने नाशिकमधून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर भाजपही सर्वशक्तिनिशी मैदानात उतरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१०) भाजपची उत्तर महाराष्ट्रस्तरीय आढावा बैठक नाशिकमध्ये होत आहे. मंत्री, खासदार, आमदार, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणूका होत आहेत. तर जानेवारीत महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा गड राहिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे. गेल्या आठवड्यात नाशिक शहरात शिवसेना शिंदे गटाने नाशिक जिल्ह्याचा मेळावा घेवून निवडणुकीचा बिगूल वाजवला. पाठोपाठ आता भाजपनेही निवडणुकांची तयारी सुरू केली असून मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण रिंगणात उतरले आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक होणार असून त्यात निवडणुकीसंदर्भातील नियोजन बंद दाराआड पदाधिकाऱ्यांना सांगितले जाणार आहे. पंचवटीतील आडगाव नाका येथील स्वामी नारायण कन्व्हेक्शन सेंटर येथे सकाळी १० वाजेपासून या बैठकीला सुरुवात होणार आहे.

निवडणुकीचा कानमंत्र मिळणार

नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार, मंत्री तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीसाठी भाजप प्रदेश कार्यालयातून ज्यांना निरोप मिळाले आहेत त्यांनाच या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तीन तासांच्या दौऱ्यात प्रत्येक जिल्ह्याला अर्धा तासाचा वेळ देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमधील राजकारणात ट्विस्ट; भाजपा नेते मामा राजवाडेंना अटक

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आलं असून, नुकतेच शिवसेना (उबाठा) तून भाजपामध्ये गेलेल्या मामा राजवाडे यांना अटक करण्यात आली आहे. गंगापूर रोडवर झालेल्या गोळीबार प्रकरणात त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं. ही कारवाई मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी घडल्यानं नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

गंगापूर रोड भागात जुन्या वैमनस्यातून दोन जणांवर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात काहींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी मामा राजवाडे यांचा सहभाग आढळून आला आहे. गुरुवारी (दि.9) 15 तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली असून शुक्रवारी आज (दि.10) न्यायालयात हजर करणार आहोत.
संदिप मिटके, सहायक पोलीस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT