मुख्यमंत्री फडणवीस  (Pudhari File Photo)
नाशिक

CM Fadnavis Nashik Daura : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी निवडणूक प्रचाराचे रणशिंग

सहा हजार कोटींच्या सिंहस्थ कामांचा उडणार बार

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर

  • सहा हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला जाणार

  • भाजपच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार (दि.१३) नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते १४०० कोटींची मल:निसरण योजना, २२४० कोटींचे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तर ९३० कोटींचे शहरातील रस्ते अशा सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. गेल्या महिनाभरातील मुख्यमंत्री फडणवीस यांचा तिसरा नाशिक दौरा असून या माध्यमातून ते भाजपच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक महापालिकेची सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. यासाठी भाजपचे निवडणूक प्रभारी तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी नाशकात शंभर प्लसचा नारा दिला आहे. या दिशेने भाजपची वाटचाल सुरू असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधून भाजपकडे जोरदार इनकमिंग सुरू आहे. राज्याच्या सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपने सुरूंग लावला आहे.

आता नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आठवडाभरात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्याही निवडणुका घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिकेच्या निवडणुका घोषित होणार असून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या कामांच्या माध्यमातून भाजपने या निवडणुकांमधील प्रचाराचा नारळ फोडण्याची तयार केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी नाशिकमध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कामांचा भूमिपूजन सोहळ्यासह अन्य कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. नाशिकमधील निवडणुकीची सूत्रे आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावाही आयोजित केला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Nashik Latest News

या सिंहस्थ कामांची उद्घाटने शक्य

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थांतर्गत ५५ कामांची सुरुवात केली जाणार आहे. यात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १८ रस्ते कामांचा समावेश आहे. या कामांची अंदाजीत किंमत २२७०.६० कोटी इतकी आहे. १८ रस्त्यांची एकूण लांबी ४४०.९७ किमी इतकी आहे. त्याचबरोबर नाशिक महापालिकेच्या शहरात होणाऱ्या रस्ते, पूल, एसटीपी, पाणी पुरवठा योजना, मलनिस्सारण, सीसीटिव्ही यासारख्या ३२ कामांचा समावेश असून, या कामांची अंदाजीत किंमत ही ३६८४.०५ कोटी इतकी आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेअंतर्गत दोन कामांसाठी ७६.०६ कोटी तर पुरातत्व विभागाकडील चार कामांसाठी १६ कोटी ५४ लाख इतका खर्च येणार आहे. शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी अस्तित्वातील एसटीपी प्रकल्पांचे अद्ययावतीकरण करणे तसेच सुधारणा करणे आणि दोन नवीन एसटीपी प्रकल्पांच्या कामांची १४७५.५० कोटी इतकी किंमत आहे. सीसीटिव्हीसाठी ३५४ कोटी तर ऑप्टीक केबल टाकण्यासाठी ७० कोटी खर्च होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सिंहस्थ कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर जाहीर सभा घेतली जाणार असून त्याचे नियोजन भाजप कार्यालयात पार पडले. नगरपालिकेच्या निवडणूका आहे. कार्यक्रम हा महापालिका हद्दीत होत आहे. म्हणून आचारसंहितेच्या नियमात बसून हा दौरा होणार आहे.
गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

जाहीर सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि.१०) भाजप कार्यालयात आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून तयारीचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे नियोजन केले आहे. या जाहीर सभेसाठी २५ हजार नागरिकांना आणण्याचे नियोजन करण्यात आले असून या निमित्ताने शक्तीप्रदर्शन भाजपकडून केले जाणार आहे. मनपा निवडणूक प्रमुख तथा आमदार ॲड. राहूल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT