पंचवटी (नाशिक) : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंडासह परिसरात साकारण्यात येणाऱ्या राम काल पथसह पायाभूत सुविधांत होणाऱ्या सुधारणा व दर्शनी भागांचा होणार विकास यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर त्यांनी काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.
राम काल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग, राम काल पथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांत सुधारणा करण्यात येणार आहे. रामकुंड, सीतागुंफा, काळाराम मंदिर, राम-लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचा होणारा विकास तसेच श्रीराम मंदिराची विविध प्रकारचे विकासकामे, मंदिर परिसराची होणाऱ्या सुशोभीकरण व भाविकांच्या सोयी-सुविधांबद्दलच्या संकल्पचित्राची प्रवेशद्वारावर पाहणी करत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती घेतली.
श्री काळाराम संस्थानतर्फे विश्वस्त मंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करत त्यांना वारकरी फेटा व तुळशीहार प्रभू श्रीराम यांची फ्रेम, शाल देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी काळारामाचे दर्शन घेत अभिषेक केला. मंदिर परिसराची पाहणी करत माहिती जाणून घेतली. राम काल पथमुळे श्री काळाराम मंदिराची विविध प्रकारचे विकासकामे, मंदिर परिसराची होणाऱ्या सुशोभिकरण व भाविकांच्या सोयी सुविधांबद्दल मंदीर पुजाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी कुंभमेळामंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखरसिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, मंदिराचे विश्वस्त शांताराम आवसरे, शुभम मंत्री, मिलिंद तारे, मंदार जानोरकर, मंगेश पुजारी, एकनाथ कुलकर्णी, धनंजय पुजारी आदी उपस्थित होते.