नाशिक : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रवासात 'ज्ञानेश्वरी' आणि 'लीळाचरित्र' हे दोन ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरले. या दोन ग्रंथांमधूनच मराठीच्या अभिजात असण्याचा पुरावा मिळाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निर्मिलेल्या महानुभाव पंथाच्या या साहित्यातून मराठीला अभिजात भाषा म्हणून रुजविण्याचे काम झाले. त्यामुळेच मुंबईऐवजी लीळाचरित्र या हस्तलिखित ग्रंथाची निर्मिती अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे करण्यात आली असून या विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर रोडवरील जय शंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या दोनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनात महानुभाव परिषदेचे मावळते अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य विद्वांसबाबा शास्त्री (फलटण) यांच्याकडून महंत मोहनराज कारंजेबाबा (अमरावती) यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कारंजेबाबा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून दिलेल्या समतेच्या शिकवणीचा गौरवोल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठीला अभिजात भाषा म्हणून रुजविण्यात महानुभाव पंथीयांच्या साहित्याचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले.
ते म्हणाले की, चक्रधर स्वामींनी सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखवत, समाजाला समतेचा विचार दिला. सातत्याने होणारी आक्रमणे, समाजातील भेदाभेद, विषमतेची दरी निर्माण झाल्याने जातिपाती, पंथांमध्ये विभागलेल्या समाजाला महानुभाव विचाराचा सन्मार्ग दाखविण्याचे काम केले. समकालीन महाराष्ट्राची आध्यात्मिक बैठक किती प्रगल्भ होती, याची प्रचिती महानुभावांच्या साहित्यातून येते. कितीही आक्रमणे, अत्याचार झाले, तरीही पंथीय व्यवस्था आणि विचार महानुभाव पंथीयांनी त्यागला नाही. त्यामुळेच हा पंथ केवळ महाराष्ट्र, भारतापुरता मर्यादित न राहाता अफगानिस्तानपर्यंत विस्तारला. या पंथातील लोक कधीही एकमेकांना जात-पात विचारत नाहीत. महानुभव पंथाने दिलेली ही शिकवण समाजाकरिता, राज्यकरिता, देशाकरिता अत्यंत महत्त्वाची आहे, असा गौरवोल्लेख करत अशा या समाजाकडे आजवर राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले. परंतु युती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून मला या समाजाच्या मागण्यांची दखल घेण्याची संधी मिळाली. महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, आमदार प्रवीण तायडे, अमोल जावळे, दिलीप बनकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप, परिषदेचे महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडेबाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे, प्रकाश नन्नावरे, दत्ता गायकवाड, प्रभाकर भोजणे आदी उपस्थित होते.
अवतार दिनाचा निर्णय समितीच्या अहवालानंतर
श्री चक्रधर स्वामींची जयंती सरकारने अवतार दिन म्हणून साजरी करावी, अशी मागणी महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत मोहनराज कारंजेबाबा यांनी मांडली. यासंदर्भात सरकारने निर्णय घेतला होता. परंतु वाद निर्माण झाल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त केली असून, समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकार महानुभाव पंथीयांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.