ठळक मुद्दे
नाशिक महापालिकेतील सर्व १२२ जागांवर भाजपचे उमेदवार उभे करण्याची तयारी
मुख्यमंत्र्यांचा संदेश : महायुतीचा पर्याय निवडा नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा
जिल्हा परिषद, नगरपरिषदा, आणि महापालिका निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीचा आढावा
नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी(दि.१०) स्वबळाचा नारा देत नाशिक महापालिकेतील सर्व १२२ जागांवर भाजपचे उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शविली; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत निवडणुकांसाठी शक्य तेथे महायुतीचा पर्याय निवडा नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा, असा संदेश दिला. मैत्रीपूर्ण लढतीतही महायुतीतील घटक पक्षात मनभेद होणार नाहीत, याची काळजी घ्या, असे सूचक विधानही मुख्यमंत्री फडणवीस केल्याने आगामी निवडणुका भाजप महायुती म्हणून लढविणार की स्वबळ आजमावले जाणार, हा सस्पेन्स कायम राहिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची उत्तर महाराष्ट्रस्तरीय नियोजन बैठक पंचवटीतील स्वामी नारायण कन्व्हेक्शन सेंटर येथे पार पडली. यावेळी नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषदा, आणि महापालिका निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी दर्शविली.
नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये पक्षाला चांगले वातावरण असून विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तिसऱ्यांदा आमदारांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी नाशिक महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी पक्षाची ताकदीचे आकडे मुख्यमंत्र्यासमोर मांडण्यात आले. स्वबळाची तयारीबाबत आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तुर्तास सबुरीचा सल्ला दिला. या बैठकीला जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पणन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार देवयानी फरांदे, अॅडव्होकेट राहुल ढिकले, सीमा हिरे, राहुल आहेर, दिलीप बोरसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बुथ, शक्तिकेंद्रनिहाय आढावा
सर्वप्रथम अहिल्यानंतर त्यानंतर नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सर्वात शेवटी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी फडणवीस आणि चव्हाण यांनी पाचही जिल्ह्यातील संघटनात्मक तयारीचा सुक्ष्म आढावा घेतला. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूण जागा, तसेच पक्षाची, विरोधकांची सद्यस्थिती, प्रवर्गनिहाय आरक्षित जागांची माहिती घेताना पक्षाचे बूथ, शक्तीकेंद्र तसेच त्यावर काम करणाऱ्या पन्ना प्रमुखांपासून तर अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. नाशिक शहरातर्फे शहराध्यक्ष सुनील केदार तर जिल्ह्याच्या वतीने यतीन कदम, सुनील बच्छाव यांनी माहिती सादर केली.
इच्छूकांचे शक्तिप्रदर्शन मोडीत
पक्षाच्या बैठकीच्या निमित्ताने इच्छूकांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. परंतू या बैठकीसाठी निमंत्रितांनाच प्रवेश असल्यामुळे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे इच्छूकांना शक्तिप्रदर्शन करता आले नाही. मात्र, उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांनी गर्दी केल्यामुळे भोजन व्यवस्थेचे नियोजन कोलमडल्याचे चित्र होते. त्यामुळे निमंत्रितांना सोडून इच्छूकांना बाहेरचा रस्ता पोलिसांनी दाखवला.