Dhule gold robbery  File photo
नाशिक

भररस्त्यात सिनेस्टाईल दरोडा; हवेत गोळीबार करत व्यापाऱ्यांकडून ३ किलो सोने लंपास

पुढारी वृत्तसेवा

धुळे: शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत गजबजलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात, मंगळवारी (दि.२२) रात्री एका धाडसी दरोड्याने संपूर्ण शहर हादरले. मोटारसायकलवरून आलेल्या तिघा दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत व्यापाऱ्याच्या हातातील तब्बल तीन किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून पलायन केले. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहादा येथील दोन सुवर्ण व्यावसायिक रात्रीच्या सुमारास एसटी बसने धुळ्यात दाखल झाले. त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेले सुमारे तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने होते. रात्री साडेआठच्या सुमारास दोन्ही व्यापारी सावरकर चौकातील बस थांब्यावर उतरले. त्याचवेळी, एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. काही कळण्याच्या आतच, त्यातील एकाने पिस्तूल काढून हवेत गोळी झाडली. अचानक झालेल्या गोळीबाराने प्रचंड घबराट पसरली. याच संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी व्यापाऱ्याच्या हातातील सोन्याची बॅग हिसकावली आणि वेगाने पसार झाले. या संपूर्ण घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, भर वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या दरोड्यामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई आणि नाकाबंदी

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पीडित व्यापाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली असून, त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या धाडसी दरोड्यामुळे पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT