सिडको : होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच सिडकोतील शुभमपार्क जवळ जोसेफ चर्च समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून फार्मसी महाविद्यालयीन युवकावर चार जणांनी चॉपरने प्राणघातक हल्ला करून खुन केला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे अरुण वैरागरसह चार ते पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित देवरे (वय २२) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडकोतील शुभम पार्क परिसरातील जोसेफ चर्चसमोर सुमीत देवरे हा गुरुवारी रात्री साडे आठ वाजता असताना संशयित आरोपी अरुण वैरागर व त्याच्या साथीदारांनी जुन्या भांडणाची कुरापत काढुन वाद केला. यावेळी अरुण वैरागर व त्याच्या साथीदार यांनी आपल्या जवळ असलेल्या चॉपरने सुमितच्या पोटावर सपासप वार केले. यावेळी सुमित देवरे हा जागीच कोसळला. घटनेनंतर संशयित आरोपींनी परिसरातून जाणाऱ्या दुचाकी वरील युवकाला दम दिला व दुचाकी हिसकावून फरार झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती अंबड पोलीसांना कळताच पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले . या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी सुमितला उचलून पोलीस गाडीत टाकले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यृ झाला. ऐन होळीच्या सणादिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलिस निरीक्षक सुनील पवार सह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.