बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज; निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था Pudhari
नाशिक

Nashik Ganesh Visarjan | सिडकोत मनपाची तयारी पूर्ण! गणेश विसर्जनासाठी 11 ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय

Nashik Ganesh Visarjan | विल्होळी तलावात विसर्जनास ग्रामपंचायतीचा प्रतिबंध; दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी, पाटबंधारे, पोलिसांना पत्र

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिडको परिसरातील सात प्रभागांत गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांसह विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच नदी, नाले आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

सिडको परिसरातील पवननगर जलकुंभ, गोविंदनगर येथील जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायामशाळा (जुने सिडको), राजे संभाजी महाराज व्यायामशाळा (कर्मयोगीनगर), राजे संभाजी स्टेडियम (अश्विननगर), अंबड पोलिस ठाणे चौक, मीनाताई ठाकरे शाळा (कामतवाडा), डे-केअर शाळा (राजीवनगर), गामणे मैदान (वासननगर), अंजना लॉन्स (पाथर्डी फाटा) तसेच वालदेवी घाट (पिंपळगाव खांब) या ठिकाणी गणेशविसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विसर्जनस्थळी निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडी उपलब्ध ठेवण्यात येणार असून, विसर्जनानंतर परिसरात स्वच्छता राखण्यासाठीही महापालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे.

गणेशभक्तांनी विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळत प्रशासनाला सहकार्य करावे तसेच गणेशमूर्ती व निर्माल्य निर्धारित ठिकाणीच जमा करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाठ, विभागीय अधिकारी नानासाहेब पगारे, बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत नांदुर्र्कीकर व विभागीय आरोग्य निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी केले आहे.

सिडको : विल्होळी गावालगत असलेल्या लघु पाटबंधारे तलावात यंदा गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिबंध घालण्याचा ठराव विल्होळी ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. यापूर्वी गणेश विसर्जनादरम्यान तलावात बुडून गणेशभक्तांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असल्याने यंदा कोणतीही दुर्घटना घडू नये, या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.

तलावात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, अनेक ठिकाणी खोल व ओबडधोबड खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच गवत व शेवाळ वाढल्याने पाण्यात उतरणाऱ्या भाविकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विसर्जनासाठी तलावाचा वापर टाळण्याची भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे.
सिडको, अंबड, पाथर्डी फाटा तसेच परिसरातील नव्याने विकसित झालेल्या वसाहतींमधून दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशभक्त विसर्जनासाठी या तलावावर येतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने विल्होळी गावालगत असलेल्या लघु पाटबंधारे तलावात यंदा गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिबंध घालण्याचा ठराव विल्होळी ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. या संदर्भातील ठराव जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक पाटबंधारे विभाग आणि पोलिस प्रशासनाला पाठविण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच जानकीबाई चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT