Parallel Bridge Parking Issue 
नाशिक

Parallel Bridge Parking Issue | चुंचाळेचा समांतर पूल होतोय पार्किंगचा अड्डा

Parallel Bridge Parking Issue | जोडरस्ता नसल्याने नवीन मार्ग वापराविना

पुढारी वृत्तसेवा

सिडको : राजेंद्र शेळके

प्रभाग २६ व २७ च्या सीमेवरील एक्सलो पॉइंट येथून चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर महापालिकेने समांतर पूल उभारला आहे. मात्र, पुलाकडे जाणारा जोडरस्ता अद्याप तयार करण्यात आलेला नसल्याने या पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही. परिणामी, नव्याने उभारलेला पूल सध्या वाहनांच्या पार्किंगसाठी वापरला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाहतूक सुरू नसल्यामुळे पुलावर दिवसभर दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहने उभी केली जातात. त्यामुळे सार्वजनिक सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या पुलाचा मूळ उद्देशच अपूर्ण राहिला आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, तातडीने जोडरस्ता तयार करून पुलावरून नियमित वाहतूक सुरू करण्याची मागणी केली आहे.

या मार्गावर वाहतूक सुरू झाल्यास चुंचाळे गाव, दत्तनगर तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच जुन्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेने पुलाचे काम पूर्ण केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे कामही तातडीने पूर्ण करून हा पूल नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. पुलाचा प्रत्यक्ष वाहतुकीसाठी वापर सुरू झाल्यास सार्वजनिक निधीतून उभारलेल्या या प्रकल्पाचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळू शकेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

"प्रभाग क्रमांक २६ व २७ च्या सीमेवरील एक्सलो पॉइंट येथून चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर महापालिकेने समांतर पूल उभारला आहे. या पुलाकडे जाणारा जोडरस्ता लवकरच तयार करण्यासाठी मनपाकडे पाठपुरावा करत आहे."
- निवृत्ती इंगोले, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT