नाशिक : ऑक्टोबर महिन्यात कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील चोर्ला घाटातील 400 कोटी रुपयांच्या नोटा असलेले दोन कंटेनर लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या लुटीचा संदर्भ देऊन नाशिक ग्रामीण पोलिस हद्दीतील एका व्यक्तीचे अपहरण, मारहाण व धमकी दिल्याचे उघडकीस आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुन्हा दाखल करून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा संबंध कर्नाटक, महाराष्ट्रातील नाशिक तसेच काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार गुजरात अशा तीन राज्यांशी असल्यामुळे सदर प्रकरणाचा पुढे तपास कोणत्या दिशेने व कसा जाईल, हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. या घटनेतील फिर्यादी व्यक्तीचे दावे व कथित व्हायरल व्हिडीओमुळे या प्रकरणात संशयाचे गडद ढग तयार झाले आहेत.
सदर घटनेमधील लूट झालेल्या रकमेचा संशयित व्यक्तींकडून शोध सुरू होता, तेव्हा नाशिकमधील घोटी वाडीवऱ्हे महामार्गावर संदीप पाटील या व्यक्तीकडे लुटीबद्दल मारहाण करून विचारणा करण्यात आली. सुरुवातीला 400 कोटी रुपयांची रक्कम लुटल्याचा दावा करण्यात आला, मात्र नंतर फिर्यादी संदीप पाटील यांनी ही रक्कम तब्बल 1,000 कोटी रुपये असल्याचा आरोप केल्याने संभ्रम अधिक वाढला आहे.
या प्रकरणात फिर्यादीने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला आहे. विशेष म्हणजे, कथित लुटलेली रक्कम ही चलनातून बाद झालेल्या नोटांची असल्याचे सांगितले जात असून, इतक्या मोठ्या प्रमाणात अशा नोटांची वाहतूक नेमकी कोणासाठी आणि कोणत्या उद्देशाने सुरू होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
संदीप पाटील यांनी दावा केला आहे की, ठाण्यातील एक नामांकित बिल्डर, एक राजकारणी आणि एका हवाला ऑपरेटरशी संबंधित रेकॉर्डिंग त्यांच्या ताब्यात आहे. तसेच, काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. पाटील यांनी आपले अपहरण करून दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप केला असून, आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेचा उगम, तिचा अंतिम लाभार्थी आणि प्रत्यक्षात कंटेनरमध्ये किती रक्कम होती, हे प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत.
गुजरात येथील आश्रमाभोवती संशय?
ही रक्कम महाराष्ट्रात परत पाठवण्यापूर्वी, तिला लहान, कायदेशीर नोटांमध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी एका आश्रमाची होती. बिल्डर आणि आश्रमादरम्यान झालेल्या करारानुसार, आश्रमाने 60:40 कमिशन-आधारित विनिमय व्यवस्थेअंतर्गत 170 कोटी रुपये कायदेशीर चलनात देणे अपेक्षित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रूपांतरित केलेले पैसे परत महाराष्ट्रात पोहोचवले जाणार होते.
महत्त्वाचे अनुत्तरित प्रश्न :
प्रत्यक्षात कंटेनरमध्ये 400 कोटी होते की 1,000 कोटी?
फिर्यादीने व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा नेमका हेतू काय?
चलनातून बाद झालेल्या नोटांची इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कशी व कुठे होत होती?
या प्रकरणात ठाणे येथील पोलिस कर्मचाऱ्यांचा संबंध नेमका काय?
2016 च्या नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात नोटा बाहेर कशा?