लासलगाव (नाशिक): लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या ७८ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत नवा टप्पा गाठला आहे. केवळ कांद्याच्या व्यापारी केंद्रापुरते मर्यादित न राहता, आता द्राक्षे व मिरचीच्या विक्रीचेही महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. खानगावजवळ उभारलेल्या तात्पुरत्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठांचे दरवाजे उघडले आहेत.
सन २००२ मध्ये लासलगाव बाजार समितीने खानगावजवळ तात्पुरते खरेदी केंद्र सुरू केले होते. सुरुवातीला येथे मुख्यतः द्राक्षांचे लिलाव होत असत. मात्र, २०१४ मध्ये आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने द्राक्षशेतीला मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी मिरची लागवडीकडे वळले. सारोळे खुर्द गावातून सुरू झालेली मिरची लागवड अल्पावधीतच परिसरात झपाट्याने वाढली.
शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीनुसार, या केंद्रात मिरची विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. आज हे केंद्र मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबारसारख्या प्रमुख बाजारपेठांशी जोडले गेले आहे. ठसकेबाज लवंगी, साधी आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये वापरली जाणारी विविध रंगांची ढोबळी मिरची येथे मोठ्या प्रमाणावर विकली जाते. विशेष म्हणजे, या केंद्रातील मिरची केवळ देशांतर्गत मर्यादित राहिली नाही, तर लंडन, दुबई, कतार, ओमान, जर्मनी यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही पोहोचली आहे.
२०२० पासून या केंद्रावर भाजीपाला लिलावालाही सुरुवात झाली. हिरवी मिरची, सिमला मिरची, बलराम, ज्वाला, ज्वेलरी, सितारा आदी वाणांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. निफाड, चांदवडसह नांदगाव, येवला आणि वैजापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना या केंद्रामुळे थेट फायदा होत आहे.
गेल्या पाच वर्षांत खानगावजवळील खरेदी केंद्रावर ८ लाख ७४ हजार ४६२ क्विंटल मिरची व भाजीपाल्याची आवक झाली असून, एकूण १६७ कोटी ३८ लाख १४ हजार रुपयांची उलाढाल झाली. यापैकी दोन लाख ९१ हजार ६०२ क्विंटल मिरचीची विक्री होऊन ७७ कोटी ७ लाख ७५ हजार रुपयांचा व्यवहार झाला आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केवळ कांद्याच्या व्यवहारापुरती मर्यादा घालून न घेता मिरची व भाजीपाला विक्रीतही आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. उत्पादक, व्यापारी आणि कामगारांसाठी अधिक सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी साडेतीन हेक्टर जागा संपादित करण्यासाठी संचालक मंडळ शासनस्तरावर पाठपुरावा करत आहे.डी. के. जगताप सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,