अभोणा, कळवण, नाशिक
अभोणा : कळवण प्रशासकीय कार्यालयासमोर शिक्षक मागणीच्या घोषणा देताना जामुनपाडा शाळेतील विद्यार्थी. (छाया : सचिन मुठे)
नाशिक

Nashik | शाळा सुरु झाली, पण शिक्षकच नाही, आम्हाला शिक्षक द्या ना...चिमुकल्यांचा मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

कनाशी : शिक्षक नियुक्तीच्या मागणीसाठी कोसवन जामुनपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट कळवण प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा नेत व्यथा मांडली. त्यात सहभागी लोकप्रतिनिधी, पालकांनी या शाळेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आरोप केला. (Children march to demand teachers)

नूतन शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही जामुनपाडा प्राथमिक शाळेला शिक्षक मिळालेले नाहीत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पालकांनी पत्रव्यवहार केला. त्यानंतरही शिक्षक हजर न झाल्याने अखेर पालकांसमवेत विद्यार्थ्यांनी कोसवन ते कळवण प्रशासकीय कार्यालय असा मोर्चा काढला. याठिकाणी शाळेत असलेल्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला. या मोर्चाची दखल घेत या शाळेवर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, कायमस्वरूपी शिक्षक नियुक्ती न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

चिमुकल्यांना पायी माेर्चा काढून शिक्षक मागावा लागणे, हे दुर्दैवी आहे. शिक्षणाचा बोजवारा उडत आहे. याप्रश्नी आमदारांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. शिक्षक उपलब्धतेची समस्या पुन्हा निर्माण झाल्यास आम्ही थेट शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करू.
-बेबीलाल पालवी, आदिवासी सेवक, नाशिक.
अभोणा : कळवण प्रशासकीय कार्यालयासमोर घोषणा देताना जामुनपाडा शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक.
ज्या शाळांवर शिक्षक कमी आहेत, त्या शाळेवर वरिष्ठांशी चर्चा करून तत्काळ शिक्षक उपलब्ध करून देऊ. शिक्षकांनी कर्तव्यात हलगर्जीपणा करू नये. याबाबत केंद्रप्रमुखांना सूचना केल्या आहेत. शिवाय, प्रत्येक शाळेवर अचानक भेटी देऊन पाहणी केली जाईल. त्यात कुणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
नीलेश पाटील, गटविकास अधिकारी, कळवण. नाशिक.
SCROLL FOR NEXT