सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील बारागावपिंप्री येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्याचा प्रयत्न एमआयडीसी पोलिसांनी वेळेवर हाणून पाडला. शनिवारी (दि.22) मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करून हा विवाह थांबवला.
अल्पवयीन मुलीचा पारंपरिक पद्धतीने विवाह लावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, उपनिरीक्षक राजू पाटील तसेच हवालदार प्रशांत वाघ, सागर गिते आणि प्रमोद भोये यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे वधू-वर पक्ष आणि वर्हाडी मंडळी उपस्थित असताना पोलिसांनी विवाहप्रक्रिया तात्काळ थांबवली.
तपासादरम्यान वधूचे शाळेचे दाखले आणि आधार कार्ड तपासले असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी नातलगांचे समुपदेशन करत बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. तसेच बालकल्याण समिती व ग्रामविकास अधिकार्यांच्या मदतीने त्या मुलीच्या संरक्षणाची कार्यवाही करण्यात आली.
बालविवाह कायद्याने गुन्हा
पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले की, मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करता येत नाही. कोणत्याही प्रकारचा बालविवाह आयोजित करणे, प्रोत्साहन देणे किंवा त्यात सहभागी होणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. अशा घटना आढळल्यास पोलिसांना कळवून सहकार्य करावे.