नाशिक : विकास गामणे
राज्यात दररोज हजारो मुले वेगवेगळ्या प्रकारच्या शोषण, अत्याचार आणि दुर्लक्षाला सामोरे जातात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्वरित मदतीसाठी सरकारने १०९८ चाइल्ड हेल्पलाइन सुरू केली आहे. हा एक टोल-फ्री क्रमांक असून, संकटात असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी 24 X 7 कार्यरत असणारी ही हेल्पलाइन वरदान ठरत आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्हा चाइल्ड हेल्पलाइनकडे तब्बल 330 तक्रारींची नोंद झाली, तर रेल्वे चाइल्ड हेल्पलाइनने जानेवारी ते ऑगस्ट 2025 या आठ महिन्यांच्या कालावधीत विविध समस्याग्रस्त 228 बालकांना मदतीचा हात दिला आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा राग, भांडणे, आमिषातून बालकांनी पलायन केले, तर काही कुटुंबीयांपासून दुरावले, गर्दीत वाट चुकलेल्या अगदी लहान वयातील बालके, तर काहींनी घरातील भांडणे, घरातील सावत्र आई - वडिलांचा त्रास, स्वातंत्र्य, प्रेमप्रकरण, पैशांची लालूच, मायानगरीचे तसेच सिनेमातील नट- नट्यांचे आकर्षण, सोशल मीडियाचे वाढते व्यसन, चोरी आदी अनेक कारणांमुळे मुले घरातून पळून जातात किंवा अशा मुलांना हेरून भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणारे नजर ठेवत जाळ्यात ओेढतात. बेवारस, हरवलेल्या मुलांची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या हेल्पलाइनवर दिल्यास संबंधित शून्य ते 18 वयोगटातील मुला - मुलींना ताब्यात घेतले जाते.पळून आलेली मुले किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, अडचणीत सापडलेल्या मुलांनी किंवा नागरिकांना अशी बालके आढळल्यास त्यांनी 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालकल्याण समिती करते. बालकांच्या संरक्षणासाठी व हक्कांसाठी कार्यरत असलेली हेल्पलाइन ही मुलांना संकटातून मुक्त करून सुरक्षिततेकडे नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संबंधित शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व पोलिस प्रशासनाच्या मदतीने या प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येते.
131 बालके पालकांच्या कुशीत सुखरूप पोहोचली. महिला व बालकल्याण समिती अशा मुलांची गरज पाहून त्यांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेते. रस्त्यावर किंवा रेल्वेस्थानक येथे बालके आढळली, तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालकल्याण समितीपुढे घेऊन जातात. त्यांच्या निवार्याची सोय केली जाते. पालकांचा शोध लागल्यास त्यांच्या ताब्यात ही बालके दिली जातात. पालकांचा शोध लागेपर्यंत ही बालके संस्थेत दाखल करून घेतली जातात. जानेवारी ते सप्टेंबर 2024 मध्ये नऊ महिन्यांत 133 बालके शून्य ते 18 वयोगटातील सापडली होती. 131 बालके पालकांच्या कुशीत सुखरूप पोहोचली होती.
बालसंगोपनाशी संबंधित सर्वाधिक 70 प्रकरणे नोंदविली गेली. त्यानंतर बालविवाहाचे 64, कौटुंबिक वादाचे 37, शोषणापासून संरक्षणासाठी 25, बालकामगार 19, हरवलेले 18 व सापडलेल्या 15 बालकांची प्रकरणे नोंदविली गेली. लैंगिक शोषणाची 15, बाल भिक्षेकरी 13, समुपदेशन 13, प्रशासकीय 15, निवासव्यवस्था 19, वैद्यकीय मदत तीन, पुनर्वसन एक, शैक्षणिक मदत एक आणि बालतस्करीची दोन प्रकरणे हेल्पलाइनसमोर आली.
बालकांसंदर्भात कुठेही काही अत्याचार, अपराध घडत असल्यास अथवा आपल्या आसपास कोणी बालक संकटात असेल किंवा त्याला मदतीची गरज असेल, अशा बालकांसाठी 1098 या क्रमांकावर संपर्क करावा.सुनील दुसाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नाशिक