नाशिकरोड : मराठा समाजाला आम्हाला कुठलाही विरोध नाही. मात्र ओबीसी समाजाची लढाई जिंकायची असेल, तर एकत्रित राहण्याची गरज आहे. ओबीसी समाजामध्ये रोटी - बेटी व्यवहार वाढवून आपसांत ऐक्य प्रस्थापित केले पाहिजे, असे प्रतिपादन ओबीसी समाजाचे नेते व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जागर लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित परिसंवादात भुजबळ यांनी ओबीसी जनगणनेची मागणी केली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती - धर्म एकत्र आणण्याचे कार्य केले. देशात आदिवासी, ओबीसींसह विविध समाजांतील साडेसहा हजार जाती आहेत. ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठी जनगणना आयुक्तांनी राज्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया राबवावी. यापूर्वी ओबीसीसाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. आदिवासी व दलित समाजाप्रमाणेच ओबीसींनाही स्वतंत्र निधी मिळावा, ही आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास पाटील सुमठानकर होते. यावेळी ओबीसी प्रमाणपत्र मार्गदर्शक कैलास आढाव व महिला सक्षमीकरण मार्गदर्शक प्रेरणा बलकवडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे, नाशिकरोड विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे, माजी नगरसेविका ज्योती खोले, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, योगेश गाडेकर, वर्षा लिंगायत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भिकन फत्तरफोडे व सागर लिंगायत प्रतिष्ठानचे संस्थापक बद्रीनाथ वाळेकर, नंदकिशोर नगरकर, डॉ संदेश हिंगमिरे आदींनी केले.