नाशिक : शिवसेना शिंदे गट आमच्यासोबत नसता, तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाचे माजी मंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील यांना लगावला.
महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये गृहमंत्री पदावरून कोणताही पेच नाही. त्याच्यावरून काहीही अडलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एका कॉन्फरन्स मध्ये व्यग्र होते. त्यामुळे शपथविधी थोडा पुढे गेला आहे असा दावाही भुजबळ यांनी केला आहे.
नाशिकमध्ये भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील सत्तास्थापनेला होत असलेल्या दिरंगाईबद्दल प्रश्न विचारला असता, सरकार स्थापनेबाबत महायुतीत कोणताही पेच नसल्याचा दावा त्यांनी केला. भुजबळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एका कॉन्फरन्समध्ये व्यग्र होते. त्यामुळे शपथविधी थोडा पुढे गेला. अंतर्गत चर्चा सर्व पक्षांत झाली आहे, प्रत्येक खाते महत्त्वाचे आहे. गृह खाते जेवढे चांगले आहे, तितकेच अडचणीचेदेखील आहे. कोण कुठे दंगल करतो, बलात्कार करतो, त्याचेदेखील प्रश्न गृहमंत्र्यांना विचारले जातात. मी गृहमंत्री असताना तर गँगवॉर सुरू होता. काळी दिवाळी साजरी केली जात होती. मुंबईत लग्नदेखील त्यावेळी कोणी करत नव्हते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर चर्चा करून मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया दिली आहे, असे भुजबळ म्हणाले.
विधानसभेला आम्ही केवळ ८५ जागा लढलो होतो. अजितदादा आमच्यामध्ये आले नसते, तर आमच्या ९० ते १०० जागा आल्या असत्या, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावरून छगन भुजबळ यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला आहे. ते आमच्यासोबत नसते, तर आमच्याही १०० जागा आल्या असत्या, असे भुजबळ यांनी सांगितले. तिघांनी मिळून जे चांगले निर्णय घेतले त्याचे फलित मिळाले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.