नाशिक : मी कोणत्याही वृत्तपत्राला अथवा अन्य कोणाला ईडीबाबत मुलाखत दिलेली नाही, तसेच ईडीबाबत कुठला दावाही केलेला नाही. त्यामुळे हे सर्व दावे आणि बातम्या तत्थ्यहीन असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक मी पाहिलेले किंवा वाचलेले नाही. तसेच, या पुस्तकात काय प्रसिद्ध झालेले आहे ते सुद्धा मी पाहिलेले नाही. मात्र, हे पुस्तक मी घेणार आहे. तसेच, माझ्या वकीलांनाही देणार आहे. त्यानंतर वकीलांशी चर्चा करुन मी पुढील योग्य ती कार्यवाही करणार आहे, असे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात ईडीबाबत केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ईडीच्या भीतीमुळेच सरकारमध्ये सहभागी झाल्याचं छगन भुजबळ यांनी पुस्तकात कथन केले आहे. तसेच सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता, असा दावाही या पुस्तकात केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भुजबळ यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही किंवा मी कुठलेही पुस्तक लिहिलेले नाही. तसेच ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप हा केवळ आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मला तुरुंगात जाण्याची कुठलीही भीती नाही. बातमीत जे काही प्रसिद्ध झाले तसे मी काहीही बोललेलो नाही. आम्ही विकासासाठीच सत्तेत सहभागी झालेलो आहोत. महाराष्ट्र सदन प्रकरणात न्यायालयाने मला क्लीन चीट दिलेली आहे. ते सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मंत्रिमंडळात होतो. त्यावेळीच न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यामुळे शंका घेण्याची किंवा संभ्रम होण्याची काहीही गरज नाही’, अशी स्पष्टोक्ती भुजबळ यांनी दिली.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही ५४ आमदार आहोत. या सर्वांवरच ईडीने कारवाई केलेली नाही. त्यामुळे शंका निरर्थक ठरते. तसेच, ईडीची कारवाई ही काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांवरच झाली असे म्हणणेही चुकीचे आहे, असे भुजबळ म्हणाले.