मंत्री छगन भुजबळ file photo
नाशिक

Chhagan Bhujbal : आरक्षण प्रश्नावर सर्वच पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी

आरक्षण प्रश्नावर राज्यात अशांततेची परिस्थिती - मंत्री छगन भुजबळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आरक्षण प्रश्नावर राज्यात अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. तसेच मराठा समाज आरक्षणाला आपला कुठलाही विरोध नाही. मात्र, ओबीसींवर अन्याय होऊ नये ही आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली येथील ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यात केले. (We have no opposition to Maratha community reservation - Minister Chhagan Bhujbal)

मंत्री भुजबळ म्हणाले, सांगली क्रांतिकारक, कलाकारांचा जिल्हा आहे. अण्णा भाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, पठ्ठे बापूराव, बालगंधर्व, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, बापू बिरू वाटेगावकर या थोर विभुतींचा हा जिल्हा आहे. मेळाव्याला विरोध ज्यांनी केला त्या नव्या पिढीने वसंतदादा पाटील यांनी जे काम केले त्यांचे आदर्श या नवीन पिढीने घ्यायला हवा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा वारसा आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन छत्रपती महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात सर्वांना समान स्थान होत. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लीम सैनिक होते. त्यात अंगरक्षकही होते. त्यांनी हिंदू मुस्लीम यासह सर्व लहान-सहान जातींना त्यांनी सोबत घेऊन राज्य केले. आता मात्र काही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांना मारतात. त्यांनी अनेकांची घरे जाळली, हॉटेलची जाळपोळ केली, अनेकांना मारहाण केली. हे कशासाठी करताय. तुम्हाला आरक्षण हवंय ते कायद्याने घ्या. आमचा कुठलाही विरोध नाही. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या हीच मागणी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, प्रा. टी. पी. मुंडे, शब्बीर अन्सारी, प्रा. लक्ष्मण गायकवाड, प्रा. लक्ष्मण हाके, ॲड. मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT