नाशिक / सिडको : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतील काही कारखान्यांतून सोडण्यात येणारे पिवळसर रंगाचे रासायनिक दूषित पाणी दत्तनगर परिसरातील बोअरवेल, नाले आणि विहिरींमध्ये मिसळत असल्याच्या तक्रारींनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. या तक्रारींची दखल घेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी गुरुवारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पाणीपुरवठा विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रभाग २७ मधील मारुती संकुल, दत्तनगर, तुळजाभवानी परिसर तसेच नवनाथ महाराज मंदिर परिसरात दूषित पाणी पोहोचत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
परिसरातील बोअरवेलमधून पिवळसर रंगाचे तसेच रासायनिक मिश्रण असलेले पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी येणे यामुळे नागरिक त्रस्त असून असे पाणी अंगाला लागल्याने फोड तसेच विविध प्रकारच्या अॅलर्जी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रासायनिक दूषित पाणी जमिनीत झिरपत असल्याने भूगर्भातील पाणीसाठा दूषित होण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने तपासणी करून दूषित पाण्याचा स्रोत शोधणे आणि नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर आहेर-आडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी केली.
बुलेट पॉईंट्स:
बोअरवेलमधून पिवळसर रंगाचे पाणी येत असल्याचा दावा
पाण्याला रासायनिक दुर्गंधी येत असल्याची तक्रार
अंगाला फोड व अॅलर्जी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे
नाले व विहिरींमध्येही दूषित पाणी मिसळत असल्याचा आरोप
संबंधित कारखान्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
जनआंदोलनाचा इशारा:
दरम्यान, नगरसेवक नितीन दातीर यांनी महापालिका प्रशासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. आगामी महासभेत हा प्रश्न उपस्थित करून संबंधित कारखान्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दूषित पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास त्यांच्या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा नितीन दातीर, शंकर घायवाळ, ज्ञानेश्वर आहेर, विजू आहेर, संतोष उगले, रंगनाथ घायवाळ यांच्यासह स्थानिक नागरिकांनी दिला आहे.