नाशिक : दिलीप सूर्यवंशी
सध्या दिवसेंदिवस हृदयरोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी 45 वर्षांवरील पुरुष आणि 55 वर्षांहून अधिक वयाच्या स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येत होते. मात्र, आता तरुण पुरुष आणि स्त्रियांमध्ये हे प्रमाण वाढले आहे.
काही दिवसांपूर्वीच नऊ वर्षांच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला. याला बदलती जीवनशैली हा घटक कारणीभूत असल्याचेच हृदरोगतज्ज्ञ सांगतात. पुरेशी झोप, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक तणावापासून मुक्तता हे चार नियम पाळल्यास हृदयरोगाला दूर ठेवता येऊ शकते. यासाठी चार गोष्टींचे नियम पाळायलाच हवे.
आपण नैसर्गिक जीवनशैलीच्या विरोधात जात आहोत. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे यामुळे रक्तदाब, हृदयरोग बळावतो. खरे तर रात्री 10 ते 5 ही झोपेची उत्तम वेळ. दुसरी गोष्ट झोपेचा दर्जा. झोप शांत लागायला हवी. रात्री 10 नंतर मोबाइल बघत बसल्यास झोपेवर परिणाम होतो. उशिरा झोपणे, उशिरा उठणे. यामुळे शरीराच्या घड्याळाप्रमाणे ज्या संप्रेरकांचा स्राव कमी- जास्त व्हायला हवा तो होत नाही. त्यामुळे रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढते. झोप व्यवस्थित झाली नाही, तर मानसिक तणाव वाढतो, तणाव वाढला की, हृदयविकाराचा धोका वाढतो.
दररोज किमान एक ते दीड तास व्यायाम हवाच. यातील 45 मिनिटे अॅरोबिक्स एक्सरसाइज करायला हवी. उदा. चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, दोरी उड्या मारणे. 15 मिनिटे जोर- बैठका, पुशअप्स, पुलअप्स वेटलिफ्टिंग. 15 मिनिटे योगासने आणि 15 मिनिटे प्राणायाम करावा. यामुळे मानसिक तणाव कमी होऊन हृदयविकाराचा धोका कमी होतो.
आजकाल साखरेचे, तेलात तळलेले पदार्थ, चायनीज फूड, दाळीचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर खाण्याची फॅशन वाढली आहे. मात्र, हे सर्व पदार्थ आजारांना आमंत्रण देणारे ठरतात. या पदार्थांमुळे पोटाचे त्रास सुरू होऊ शकतात. खरेतर आहारातले घटक, प्रमाण आणि वेळ अतिशय महत्त्वाची आहे. आपले शरीर हे शाकाहारी अन्नासाठी तयार झालेले आहे त्यामुळे मांसाहार टाळावा. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळावे. जसे की, मैदा, साखर, पांढरे मीठ, पॉलिश केलेला तांदूळ, रिफाइन्ड ऑइल हे प्रक्रिया केलेल्या पदार्थ टाळावेत. सकाळच्या एकचतुर्थांश सायंकाळी खावे. रात्रीचे जेवण कमी असावे. रात्रीच्या जेवणाचे पचन होत नाही. त्यामुळे मेद, वजन, रक्तातले कॉलेस्ट्रॉल वाढते. निद्रानाश होतो. आहाराची सुरुवात सॅलेडने करावी.
स्पर्धेच्या युगात सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आणि मानसिक तणाव आहे. शाळा, कॉलेजमधील मुलांपासून नोकरी करणाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे तणावाशी संबंधित संप्रेरके वाढून रक्तदाब वाढतो, रक्तदाब वाढल्यास हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते परिणामी रक्तवाहिन्या आंकुचन पावतात अन हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे तणाव व्यवस्थापन हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. तणाव व्यवस्थापनासाठी नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा करायला हवी. प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवे.
ज्या कुटुंबात आजी, आजोबा, आई- वडील यांना हृदयविकाराचा त्रास असेल अशा कुटुंबामध्ये मुलांना हृदयरोगाचा धोका होऊ शकतो. मात्र, योग्य जीवनशैलीमुळे हा धोका टाळता येऊ शकतो.
जेव्हा शरीर इन्सुलिन हार्मोन योग्यरीत्या तयार करत नाही किंवा वापरत नाही, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. साखरेची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे. जीवनात या 4 गोष्टींचे पालन केल्यास हृदयरोगाला आपण निश्चित दूर ठेवू शकतो.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक नियमाप्रमाणेच शरीराचे घड्याळ चालायला हवे. रात्री उशिरा झोपणे, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव आणि अयोग्य आहार यामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. किमान सात तास शांत झोप हवी. दररोज एक तास व्यायाम, अधिकाधिक पालेभाज्या, फळभाज्यांचे सेवन हवे.डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, आंरराष्ट्रीय हृदयरोगतज्ज्ञ, श्रीसाईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अॅण्ड रिसर्च सेंटर, नाशिक