मनमाड कृषि उत्पन्न बाजार समिती File
नाशिक

Manmad Bazar Samiti | मनमाड बाजार समितीत सत्तांतर उंबरठ्यावर

सभापतींनी एेनवेळी स्थगित केली सर्वसाधारण सभा

पुढारी वृत्तसेवा

मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पडद्यामागे सत्तांतराची व्यूहरचना होत असताना, सभापती दीपक गोगड यांनी शुक्रवारी (दि. ७) होणारी सर्वसाधारण सभा अपरिहार्य कारणास्तव स्थगित केली. दरम्यान, अल्पमतातील सत्ताधारी गटाचे सभापती गोगड यांचे अधिकार काढून घ्यावेत, यासंदर्भात उपजिल्हा निबंधकांकडे तक्रार अर्ज दाखल झाला असून, सर्वसाधारण सभेत आम्ही अविश्वास ठराव आणणार होतो, त्यामुळेच सभा स्थगित केल्याचा आरोप संचालक तथा माजी आमदार संजय पवार, माजी सभापती किशोर लहाने यांनी केला आहे.

दीड वर्षापूर्वी बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक झाली. १८ पैकी १२ जागांवर माजीमंत्री छगन भुजबळ समर्थकांनी विजय मिळवत सत्तेचा सोपान चढला होता. तर आमदार सुहास कांदे समर्थकांना चार जागांवर समाधान मानावे लागले होते. दोन जागांवर यशस्वी व्यापारी गटाने भुजबळ गटाला पाठिंबा दिला होता. दरम्यान, संचालक तथा माजी आमदार पवार यांनी भुजबळांची साथ सोडली. त्यानंतर आणखी पाच संचालक कांदे गटात डेरेदाखल झाल्याने विरोधकांकडे सत्ता काबिज करण्यासाठी आवश्यक असलेले १० सदस्यांचे बळ आले आहे. त्यात पवार, किशोर लहाने, कैलास भाबड, मधुकर उगले, अशोक डगळे, दशरथ लहिरे, आप्पा कुणगर, विठ्ठल आहेर, सुभाष उगले आणि संगीता कराड आदींचा समावेश आहे. सत्ताधारी गटाकडे आता केवळ गोगड, गणेश धात्रकसह इतर चार असे ६ संचालक राहिलेत. व्यापारी गटही अस्थिर असल्याने आमदार समर्थकांनी सत्ता हस्तगत करण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहेत. त्यातूनच सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव दाखल होण्याच्या शक्यतेनेच सभापतींनी सभाच रद्द केल्याचा दावा केला जात आहे.

नियमानुसार आता ही सभा तीन दिवसांत घ्यावी लागणार असल्याने, ती सोमवारी (दि. १०) होण्याची शक्यता आहे. मात्र, ती पुन्हा स्थगित होण्याची अटकळ बांधली जात असल्याने १० संचालकांनी नियमानुसार सभा घ्यावी, असा अर्ज सचिवांना देण्यात आला आहे. आता विरोधी गटाकडून अविश्वास ठराव दाखल होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धात्रकांच्या भूमिकेकडे लक्ष

विशेष म्हणजे, भुजबळ गटात संजय पवार, दीपक गोगड, गणेश धात्रक सोबत होते. मात्र पवारांपाठोपाठ इतर आणखी पाच संचालक आमदार कांदे गटाला जाऊन मिळालेत. सद्या गोगड आणि धात्रक एकत्र असले तरी विधानसभा निवडणुकीत गोगड यांनी गणेश धात्रक यांच्याविरोधात समीर भुजबळ यांचे काम केले होते. त्यामुळे त्यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यातून येत्या सर्वसाधारण धात्रक काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT