Chandwad Leopard Attack | दरेगाव शिवारात बिबट्याने महिलेला नेले २० फूट फरफटत... Pudhari
नाशिक

Chandwad Leopard Attack | दरेगाव शिवारात बिबट्याने महिलेला नेले २० फूट फरफटत... , मुलाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

परिसरात भीतीचे वातावरण, प्राथमिक उपचारानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : तालुक्यातील दरेगाव येथील भंडारदरा (वाघड) मळा परिसरात बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ज्ञानेश्वर देवरे यांच्या पत्नी संगीता देवरे या रात्री दोन वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने त्यांच्या मानेजवळ व कानाजवळ पकड घेत सुमारे वीस फुटांपर्यंत फरफटत नेले.

या वेळी संगीता देवरे यांनी आरडाओरड केल्याने त्यांचा मुलगा गोकुळ देवरे तात्काळ घराबाहेर धावून आला. त्याने धाडस दाखवत बिबट्याला हुसकावून लावल्याने संगीता देवरे यांचे प्राण वाचले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

या घटनेनंतर दरेगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघड परिसर हा डोंगरदऱ्यांचा भाग असल्याने येथे बिबट्याचा नियमित वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यापूर्वीही बिबट्याने शेळ्या, गायी व वासरांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.

वनविभागाने सुकदेव आहेर यांच्या वस्तीजवळ, भावराव देवरे यांच्या वस्तीजवळ तसेच अशोक गांगुर्डे यांच्या घराजवळ असे तीन पिंजरे लावले आहेत. घटनेपूर्वी एक पिंजरा लावण्यात आला होता, मात्र हल्ल्यानंतर आणखी दोन पिंजरे वाढवून बिबट्याच्या हालचाली असलेल्या भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक मनमाड व चांदवड विभागाचे शिवाजी सहाने, वनपरीक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. के. खंदारे, वनरक्षक पूनम साळवे, करणासिंग परदेशी, प्रवीण चव्हाण, सुरेखा मरशीवने, वनमजूर शफिक सय्यद, विजय माळी, वाहनचालक अशोक शिंदे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT