मुंबई- आग्रा महामार्गावर सोग्रस फाट्याजवळ अपघात
टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना दिली धडक
चालकाने मद्यपान केल्याचा संशय
Mumbai Agra highway Nashik Accident
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्याजवळ शुक्रवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. शाळा सुटल्यानंतर घरी पायी जाणाऱ्या शाळकरी मुलांना छोट्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 13 विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला या घटनेनं गावात परिसरात शोककळा पसरली आहे.
सोग्रस फाट्याजवळ भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर टेम्पो उलटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात घडला त्याचवेळी राज्याचे मंत्री दादा भुसे आपल्या ताफ्यासह मालेगावकडे जात होते. रस्त्यावर अपघात आणि गर्दी पाहून त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतले असून त्याने मद्यपान केले असावे, असा संशय आहे. टेम्पोचालकाला वैद्यकीय तपासणीसाठी नेल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे दादा भुसे यांनी रुग्णालायत जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी करत पालकांना धीर दिला.
दरम्यान, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. संतप्त ग्रामस्थांनी काही काळ वाहतूक रोखण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी समजून काढून ग्रामस्थांना बाजूला केल्याचे समजते.