नाशिक रोड : गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. पाणंद रस्ते मुक्त करत शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर), आयुष प्रसाद (जळगाव), जितेंद्र पापळकर (धुळे), मिताली सेठी (नंदुरबार) उपस्थित होते.
यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते निफाड तालुक्यातील दोन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी वाळूच्या मोफत पासचे वितरण करण्यात आले. तसेच 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात यशस्वी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यात उपविभागीय अधिकारी नितीन मुंडवारे (अमळनेर, जि. जळगाव), शरद मंडलिक (शिरपूर, जि. धुळे), आप्पासाहेब शिंदे (दिंडोरी, जि. नाशिक), तहसीलदार नानासाहेब आगळे (जामनेर, जि. जळगाव), अमोल मोरे (राहाता, जि. अहिल्यानगर), महेंद्र माळी (शिरपूर, जि. धुळे) यांचा समावेश आहे.
महसूलमंत्री म्हणाले की, घरकुलांच्या बांधकामासाठी वाळू उपलब्धतेसाठी आपापल्या जिल्ह्यातील नदी, नाल्यांतील वाळूचे सर्वेक्षण करतानाच एम. सॅण्ड वाळूचे उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन द्यावे. दरम्यान विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी महसूल विभागातर्फे नाशिक विभागात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना नाशिक विभागाची महसूलवसुली १०७ टक्के झाल्याचे स्पष्ट केले.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा आढावा यावेळी घेण्यात आला. नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिलवडे दूरदृश्य संवाद प्रणाली माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बावनकुळे यांनी दस्त नोंदणी अधिकाधिक सुलभ करताना नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे आवाहन केले. १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्नेहलता पाटील (जळगाव), सतीश कोकरे (सिन्नर), रुपेश चेनुकर (जळगाव) यांचा सत्कार करण्यात आला.
भूमी अभिलेख विभागाच्या आढाव्याप्रसंगी जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी आणि भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक महेश इंगळे यांनी विभागाची माहिती दिली. यावेळी बावनकुळे यांनी तक्राररहित विभाग निर्मितीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भर देण्याचे आवाहन केले. उल्लेखनीय कामगिरीबद्दल शीतल लेकुरवाळे (जामनेर), नंदा बहिरम (पेठ, जि. नाशिक), कुंदन परदेशी (साक्री) यांचा सत्कार करण्यात आला.