देवळाली कॅम्प (नाशिक) : येथील खंडोबा टेकडीवरील प्रसिध्द खंडोबा महाराजांच्या विवाह सोहळ्यासाठी हळद फोडणे, जात्यावर हळद दळण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. ही हळद यात्रेच्या दिवशी सायंकाळी खंडेराव महाराजांना लावली जाईल. दुसऱ्या दिवशी खंडोबा महाराजांचा विवाह सोहळा होईल.
बुधवार (दि.26) रोजी चंपाषष्ठी निमित्त होणाऱ्या यात्रोत्सवासाठी देवळाली कॅम्पच्या टेकडीवरील खंडोबा महाराज मंदिर सज्ज झाले आहे. शुक्रवार (दि.21) रोजी पुजारी आमले परिवाराच्या वतीने मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंदिरात फुलांच्या सजावटीचे काम प्रगती पथावर आहे. मंदिरास नेत्रदीपक रोषणाई देखील करण्यात आली आहे.
खंडोबा महाराजांच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हळद फोडणे, जात्यावर हळद दळण्याचा कार्यक्रम दुपारी मंदिराच्या प्रांगणात पार पडला. उपस्थित महिलांनी आदींनी पारंपारिक गीते गाऊन हळद फोडण्याचा, दळण्याचा कार्यक्रम केला. बुधवारी (दि. २६) रोजी चंपाषष्ठीला पहाटे मंदिराचे पुजारी आमले परिवार वतीने अभिषेक त्यानंतर ८ वाजेला अण्णाज टेम्पल हिल ग्रुपतर्फे महाआरती होईल. मंदिराचे परंपरागत पुजारी आमले यांच्या भगूर येथील निवासस्थानातून पालखी मिरवणूक काढली जाईल. ती मंदिरात आल्यावर आरती होऊन मंदिरातर्फे दुपारी महाप्रसाद वाटप होईल. दुपारी ४ वाजेला देवळाली कॅम्प शहरातून पालखी आणि आश्वची मिरवणूक पार पडेल.
सायंकाळी साडेपाच वाजेला मल्हारीभक्त उत्तम मांडे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करतील. २७ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजेला यात्रा परतीची आरती होईल. दुपारी ४ वाजता कुस्त्यांची दंगल पार पडेल. त्यानंतर खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचा समारोप होईल.
श्री मल्हारी सप्तशती पाठ वाचन
संसरी गावातील स्वामी समर्थ केंद्रातील महिलांनी रविवारी मंदिराच्या प्रांगणात श्री मल्हारी सप्तशती पाठ वाचन करत परिसर मंत्र मुग्ध केला.
वडनेर दुमाला : सालाबादप्रमाणे यावर्षीही चंपाषष्ठी उत्सवाचे औचित्य साधत खंडेराव महाराज मंदिरात महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.26) रोजी खंडेराव महाराज मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७ वाजता महाप्रसादासाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री खंडेराव महाराज मंदिर पाळदे मळ्याशेजारी, वडनेर दुमाला नॉर्थ रेंज रोड परिसरातील प्रशस्त जागेवर करण्यात आलेले आहे. तरी भाविकांनी खंडेराव महाराजांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मधुकर सुकदेव पोरजे यांनी केले आहे.