नाशिक

'कुंभ मेळ्यातील आव्हाने' | सिंहस्थ कुंभमेळा पर्वण्यांचे मुहूर्त भर पावसाळ्यात!

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्वण्यांचे मुहूर्त भर पावसाळ्यात असून नाशिक- त्र्यंबकेश्वर या दोंन्ही ठिकाणचा पाऊस व पूरस्थितीचा इतिहास पाहता 1966 ते 2016 पर्यंत अनेकदा गोदावरीला मोठे पूर येऊन गोदाघाटावरील अनेक वस्त्या तसेच ग्रामीण भागातील गावांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन पर्वणी काळात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उ‌द्भवल्यास लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविक, साधू- महंतांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

2026 मध्ये कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होऊन मुख्य तीनही शाही स्नान (पर्वणी) 2027 मध्ये होत आहेत. म्हणजेच तयारीसाठी प्रशासनाकडे अवघा दोन वर्षांचा कालावधी आहे. पहिले शाही स्नान 2 ऑगस्ट, दुसरे 31 ऑगस्ट 2027, तर तिसरे शाही स्नान 12 सप्टेंबर 2027 रोजी आहे. या व्यतिरिक्त नागपंचमी, जन्माष्टमी, गणेशोत्सव अशा विविध सणवारांच्या एकूण 37 पर्वण्या भर पावसाळ्यात आहेत. विशेष म्हणजे पहिल्या पार्वणीला लागूनच तिसरा श्रावणी सोमवार येत आहे. दुसऱ्या बाजूला याच काळात नाशिकसह- त्र्यंबक परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. अनेकदा अतिवृष्टी झाल्याने धरणांतून गोदावरीत पाणी सोडावे लागल्याने पूरस्थिती निर्माण होते. यात नाशिक शहरातील अनेक वाड्या-वस्त्या पाण्याखाली जातात. या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यास पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी महापालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आधुनिक यंत्रसामग्रीसह प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे.

आपत्ती निवारणासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची गरज

कुंभेळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच महानगरपालिकेच्या आपत्ती विभागात पूरस्थिती तसेच प्रत्यक्ष कुंभमेळ्यात काम केलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची गरज आहे. या विभागामार्फत साधनसामग्री तयार ठेवणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे ही कामे आतापासूनच होण्याची गरज आहे. अन्यथा ऐनवेळी बचाव पथकाला प्रत्यक्ष काम करताना नदीचे पात्र, संभाव्य धोके, यंत्रसामग्री हाताळताना अडचणी येऊन अनर्थ होऊ शकतो.

प्रमुख पर्वण्यांचे मुहूर्त

  • पहिली पर्वणी : सोमवार 2 ऑगस्ट 2027

  • दुसरी पर्वणी : मंगळवार 31 ऑगस्ट 2027

  • तिसरी पर्वणी : रविवार 12 सप्टेंबर 2027

  • या शिवाय सण-उत्सवांतील एकूण 37 पर्वण्या असणार आहेत

कुंभमेळा काळातील संभाव्य सर्व आपत्तींचा सामना करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. पूरपरिस्थिती धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर विसंबून असते. त्यामुळे पाणी सोडण्याचे नियोजन दक्षपणे केले जाईल. तसेच आपत्ती व्यवस्थापणाच्या दृष्टीने मागील कुंभमेळ्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना पाचारण केले जात असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चित होईल. तसेच विविध संस्थांच्या स्वयंसेवकांची मदत घेतली जाईल.
जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT