नाशिक

CG Power Nashik | नाशिकमध्ये रोजगाराच्या नवीन संधी; सीजी पॉवरची व्हिल्होळी प्रकल्पात मोठी गुंतवणूक

CG Power Nashik | सीजी पॉवरचा नाशिकला 35.17 कोटींचा 'पावर बूस्ट'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतातील आघाडीची औद्योगिक कंपनी असलेल्या सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमिटेडने नाशिकच्या व्हिल्होळी येथील अतिउच्चदाब गॅस इन्सुलेटेड स्विचगिअरनिर्मिती प्रकल्पाच्या विस्तारासाठी ३५.१७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विस्तार प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
देशभरात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक वीजवापर तसेच वीज वितरण यंत्रणेचा विस्तार वेगाने होत असल्याने अतिउच्चदाब गॅस इन्सुलेटेड स्विचगिअरची मागणी वाढत आहे. व्हिल्होळी येथील कंपनीचा विद्यमान प्रकल्प सध्या पूर्णक्षमतेने कार्यरत असून उत्पादन, चाचणी आणि साठवणुकीसाठी उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात प्रलंबित मागणी असल्याने उत्पादन क्षमता वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

२२८ वरून ६०० युनिटपर्यंत क्षमता

विस्तारानंतर नाशिक प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता सध्याच्या २२८ युनिटवरून तब्बल ६०० युनिटपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. विस्ताराचे काम पुढील चार ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी कोणतेही कर्ज घेण्यात येणार नसून, ३५.१७ कोटी रुपयांचा संपूर्ण खर्च कंपनीच्या अंतर्गत निधीतून केला जाणार आहे.

स्थानिक उद्योगांना संधी

व्हिल्होळी येथील विस्तारामुळे कंपनीच्या वीज उपकरणनिर्मिती विभागाला तातडीने अतिरिक्त उत्पादन क्षमता उपलब्ध होणार आहे. परिणामी नाशिकमधील औद्योगिक उत्पादन वाढण्यासोबतच स्थानिक पुरवठादारांना अधिक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. उत्पादनवाढीमुळे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार असल्याने सीजी पॉवरचा हा विस्तार नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

पहिल्या तिमाहीत १६.३ टक्के वाढ

कंपनीने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकालही जाहीर केले. कंपनीच्या निव्वळ विक्रीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत १६.३ टक्क्यांची वाढ झाली असून, ती ३१३.०१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आर्थिक निकालानंतर भांडवली बाजारातही कंपनीच्या समभागाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT