Newborn Baby Pudhari
नाशिक

Nashik District Hospital | बालक अतिदक्षता विभागातील सुविधांचे ऑडिट करा

Nashik District Hospital | त्रुटींची पूर्तता करण्याचे सीईओ ओमकार पवार यांचे निर्देश : जिल्हा रुग्णालयास भेट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभाग कक्ष व संबंधित आरोग्य सुविधांचे अग्निसुरक्षा ऑडिट तातडीने करून घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिले. तसेच ऑडिटमध्ये निदर्शनास आलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी डीपीसीअंतर्गत आवश्यक प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

अमरावती येथे नवजात बालकांच्या अतिदक्षता संदर्भात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांची सुरक्षितता व गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सोमवारी (दि. २४) जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभाग कक्षाची पाहणी केली.

यावेळी नवजात बालकांच्या अतिदक्षता विभाग कक्षातील नवजात बालकांसाठी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा, उपकरणांची कार्यस्थिती, ऑक्सिजन व्यवस्था, विद्युत व बॅकअप व्यवस्था, स्वच्छता, संक्रमण प्रतिबंधक उपाययोजना, औषधांचा साठा, अग्निसुरक्षा तसेच आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेण्यात आली.

पाहणीदरम्यान करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये निदर्शनास आलेल्या अपूर्तता व त्रुटींची पूर्तता कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तत्काळ करण्याचे निर्देश पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभाग कक्षासारख्या संवेदनशील विभागामध्ये सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही बाब प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नवजात बालकांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे सुस्थितीत व कार्यरत असणे, ऑक्सिजनचा अखंड पुरवठा, वीजपुरवठ्याचा पर्यायी स्रोत, आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा तसेच संक्रमण नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

नवजात बालकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ऑडिटमध्ये आढळलेल्या सर्व त्रुटींची तातडीने पूर्तता करून नवजात बालकांच्या अतिदक्षता विभाग कक्षांमधील सेवा अधिक सुरक्षित, सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT