नाशिक

Malegaon Railway Line | मालेगाव रेल्वेमार्गासाठी भूसंपादन कार्यवाही तीव्र करण्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे प्रशासनाला निर्देश

Malegaon Railway Line | दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेताना, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे प्रशासनाला निर्देश

पुढारी वृत्तसेवा

धुळे / नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंत्रमाग उद्योगात अग्रेसर मालेगाव शहराचा समावेश हा देशातील पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ११० शहरांमध्ये आहे. मालेगाव वगळता अन्य सर्व शहरे रेल्वे मार्गाशी जोडले गेले असून, मालेगावला रेल्वे मार्गशी जोडण्यासाठी मनमाड - मालेगाव - धुळे या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी भू संपादनाची कार्यवाही मोहिमेस्तरावर सुरू करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, असे निर्देश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ४) जिल्हा प्रशासनाला दिले.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक आणि धुळे जिल्हा प्रशासनाशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत, प्रस्तावित रेल्वे मार्गाचा आढावा घेतला. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (नाशिक), भाग्यश्री विसपुते (धुळे), सहायक जिल्हाधिकारी अर्पिता दुबे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

औद्योगिक क्लस्टरला चालना द्या

मालेगाव शहराचा विकास केवळ रेल्वे कनेक्टिव्हिटीपुरता मर्यादित न ठेवता, औद्योगिक क्लस्टरच्या माध्यमातून शहराला सक्षम औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. यासाठी उद्योग विभागाचे सचिव बी. अन्बलगन यांनी पुढाकार घेऊन औद्योगिक क्लस्टरच्या विकासाला चालना द्यावी, अशा सूचना यावेळी केल्या. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रस्तावित मनमाड - मालेगाव - धुळे या रेल्वेमार्गासाठी आतापर्यंत झालेल्या भू संपादनाची माहिती दिली.

उर्वरित क्षेत्र भू संपादनासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत असून, लवकरच हा विषय मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मालेगाव हे उत्तर महाराष्ट्रातील यंत्रमाग, वस्त्रोद्योग, उद्योग आणि व्यापाराचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या शहराशी थेट रेल्वे जोडणीमुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मनमाड - मालेगाव - धुळे रेल्वेमार्गामुळे प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीला मोठी चालना मिळू शकते. कच्चा माल, यंत्रसामग्री आणि तयार उत्पादनांच्या वाहतुकीसाठी अधिक सक्षम पर्याय उपलब्ध होऊन उद्योगांच्या विस्ताराला मदत होणार आहे.
मनमाड - मालेगाव - धुळे मार्ग आणि औद्योगिक क्लस्टर विकास या दोन्ही बाबींमुळे मालेगावच्या आर्थिक विकासाला नवीन दिशा मिळू शकते.

रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीचा खर्च व वेळ कमी होण्यास मदत होईल. तसेच व्यापारी, उद्योजक, कामगार आणि प्रवाशांसाठी दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

मालेगावच्या भौगोलिक, लोकसंख्यात्मक आणि औद्योगिक महत्त्वाचा विचार करून, रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा प्रशासन, रेल्वे यंत्रणा आणि उद्योग विभाग यांच्या समन्वयातून या प्रस्तावाच्या पुढील कार्यवाहीला गती मिळाल्यामुळे मालेगावच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT