Raksha Khadse petrol pump robbery
जळगाव : जिल्ह्यात आरोपींवर अंकुश बसवण्यासाठी पोलीस प्रशासन विविध कारवाया करत असतानाही, मुक्ताईनगर येथील 'रक्षा ऑटो फ्युएल्स' या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एक लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. या प्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला 'रक्षा ऑटो फ्युएल्स' हा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे. गुरुवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या पाच जणांनी अचानक पंपावर असलेल्या प्रकाश माळी व दीपक खोसे या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून गल्ल्यातील आणि कर्मचाऱ्यांकडे असलेली जवळपास एक लाख रुपयांची रोकड लंपास केली. तसेच, या पेट्रोल पंपावरील कार्यालयातील संगणक (कम्प्युटर), प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड केली.
हा पेट्रोल पंप हा राष्ट्रीय महामार्ग 53 ला लागून असल्याने रात्री उशिरापर्यंत या महामार्गावर वर्दळ असते. या महामार्गावर असलेल्या पंपावर दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. दरोड्याची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.
मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी तोडफोड व रोकड घेऊन बोहर्डी या दिशेने गेल्याची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस स्टेशन निरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांनी तात्काळ त्या दिशेने पोलीस पथके रवाना केली. विशेष म्हणजे मुक्ताईनगरमध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये चार ते पाच घरफोड्या झालेल्या आहेत. यामध्ये दोन भरदिवसा घरफोड्या झालेल्या आहेत.