नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक ते सोलापूर या ३७४ किलोमीटर लांबीच्या भव्य सहा पदरी (6-Lane) महामार्गाला केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र एकमेकांना अधिक वेगाने जोडले जाणार आहेत.
३१ तासांचा वेळ आता थेट १७ तासांवर
या महामार्गाच्या बांधकामासाठी सुमारे १९ हजार १४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या नाशिक ते सोलापूर प्रवासासाठी लागणारा ३१ तासांचा वेळ (जड वाहतुकीसह) आता थेट १७ तासांवर येणार आहे. तसेच सध्याचे ४३२ किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते ३७४ किलोमीटरवर येईल. हा महामार्ग केवळ शहरांनाच नाही, तर ८ रेल्वे स्थानके आणि ६ विमानतळांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
'या' जिल्ह्यांना होणार थेट फायदा
हा महामार्ग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चार जिल्ह्यांमधून जाणार आहे. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर), धाराशिव आणि सोलापूरचा समावेश आहे. या महामार्गामुळे राज्याच्या दळणवळणाला नवी गती मिळेल. विशेषतः शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग 'गेम चेंजर' ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.