नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस (आयडीईएस) चे अधिकारी अजय कुमार यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला. तपासात त्यांच्या नावावर ५ कोटी ७२ लाख ७९ हजार ५०६ रुपयांची अपसंपदा, म्हणजेच उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ११३.५८ टक्के अधिक मालमत्ता आढळल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
या प्रकरणात त्यांची पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मलादेवी यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. यापूर्वी २०२४ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर सीबीआयने अजय कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर सखोल तपासात १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या १० वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. या प्रकरणी सीबीआयच्या मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे उपअधीक्षक रणजित पांडे यांनी फिर्याद दिली असून, पुणे येथील सीबीआय एसीबीचे उपअधीक्षक गिरीश सोनी अधिक तपास करीत आहेत.
दोन दिवसांपूर्वी पुणे येथील सीबीआय कार्यालयात हा गुन्हा नोंदविण्यात आला सीबीआयच्या माहितीनुसार, तपास कालावधीत अजय कुमार यांचे अधिकृत उत्पन्न ५ कोटी ४ लाख २८ हजार ९२४ रुपये होते. त्याच कालावधीत खर्च ५ कोटी १७ लाख ९३ हजार ४४ रुपये झाला, तर त्यांच्या नावावर ५ कोटी ७२ लाखांहून अधिक बेहिशेबी मालमत्ता आढळली. अजय कुमार हे यूपीएससीमार्फत निवड झालेले आयडीईएसच्या २०१२ बॅचचे वर्ग-एक अधिकारी असून, नाशिक आणि बंगळुरू येथे सेवा बजावल्यानंतर सध्या जम्मू येथे कार्यरत आहेत.
सीबीआय तपासातील निष्कर्ष
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता : ११३.५८ टक्के एकूण बेहिशेबी मालमत्ता : ५,७२,७९,५०६ अधिकृत उत्पन्न : ५,०४,२८,९२४ एकूण खर्च : ५,१७,९३,०४४ तपास कालावधी : १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४