नाशिक: सध्या भारतीय इक्विटी म्युच्युअल फंड्सनी त्यांच्या रोकड साठ्यात वाढ केली असून, एकूण इक्विटीतील निधीच्या (एयूएम) तुलनेत रोकड पातळी सहा टक्क्यांवर पोहचली आहे. ती चार टक्क्यांच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक आहे. फंड मॅनेजर्स बाजाराच्या योग्य वेळेच्या अचूक शोधात आहेत का, अथवा सध्याच्या अनिश्चिततेत संरक्षणात्मक भूमिका घेतली आहे का? अशी चर्चा गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रात सुरू झाली आहे.
इक्विटी म्युच्युअल फंड्स सामान्यतः शेअरबाजारात पूर्णपणे गुंतवणूक करतात. त्यामुळे बाजाराच्या वाढीचा पूर्ण लाभ घेता येतो. मात्र, बाजार उच्चांकी पातळीवर असल्याचे त्यांना वाटल्यास किंवा अस्थिरतेत फंड व्यवस्थापक अधिक रोकड ठेवण्याचा निर्णय घेतात. अशा "कॅश कॉल्स"चा उद्देश बाजार घसरणीत गुंतवणूकदारांची भांडवली रक्कम सुरक्षित ठेवणे आणि परताव्यासाठी तरलता उपलब्ध ठेवणे, हा आहे.
"कॅश कॉल" म्हणजे एखाद्या फंडची मासिक रोकड एयूएमच्या आठ टक्क्यांपेक्षा अधिक असते आणि ती त्याच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा दोन स्टँडर्ड डेव्हिएशनने अधिक असणे, असा कालावधी होय. मे 2015 ते एप्रिल 2025 दरम्यानच्या आकडेवारीनुसार 294 डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडांकडील (सेक्टरल फंड्स आणि नवीन फंड्सना वगळता) रोख निधींचा अभ्यास करण्यात आला आहे.
फंड व्यवस्थापक वारंवार हा कॉल घेत नाही. 294 पैकी सुमारे 70 टक्के (208 फंड्स) फडांनी गेल्या दहा वर्षांत किमान एकदातरी कॅश कॉल घेतला आहे. केवळ 25 टक्के फंड्सनी पाचपेक्षा अधिक वेळा असे कॉल्स घेतले. बहुतांश मॅनेजर्सने कधीतरी ही रणनीती वापरली आहे. त्यात सातत्य नाही. एप्रिल महिन्यात केवळ 16 फंड्सनी मोठ्या प्रमाणात कॅश कॉल घेतले आहेत. हा निर्णय काही ठराविक फंड्सपुरता मर्यादित आहे.
कॅश कॉल यशस्वी ठरत नसल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. या संशोधनात 573 स्वतंत्र कॅश कॉल्सच परीक्षण करण्यात आले. त्यापैकी फक्त २२५ (39 टक्के) कॉल्स अशा कालखंडात घेतले गेले जेव्हा बेंचमार्क निर्देशांकाने नकारात्मक परतावा दिलेला नाही. त्यातही बहुतांश कॉल्स लघुकालीन होते. 85 टक्के कॉल्स एक ते दोन महिन्यांपुरते होते. फक्त 13 कॉल्स 5 महिन्यांहून अधिक टिकले. मध्यम कालावधीचे (3 ते 5 महिने) कॉल्स यशस्वी होण्याचे प्रमाण किंचित अधिक (51 टक्के) होते. पण सर्वसामान्य 1-2 महिन्यांचे कॉल्स 38 टक्के यशस्वी ठरले. यावरून बाजारात टाइमिंग साधणे अनुभवी तज्ज्ञांनाही खूप अवघड गेले.
अतिशय संयम राखत फंड व्यवस्थापकांनी वाढलेल्या रोकड पातळीचा वापर केला. परंतु त्यांना सातत्याने बाजाराची अचूक वेळ साधता आलेली नाही. ही रणनीती अस्थिरतेच्या काळात तरलता राखताना नुकसान कमी करण्यास मदत करते, पण तेजीच्या काळात कामगिरीवर मर्यादा आणते, असे संशोधनात दिसून आले आहे.
सप्टेंबर–ऑक्टोबर 2018: आयएल ॲण्ड एफएस डिफॉल्ट आणि एनबीएफसी संकटावेळी अनेक फंड्सनी रोकड साठवली.
जुलै 2019: अर्थसंकल्पात अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आणि मंदीच्या भीतीने रक्षणात्मक धोरणाचा स्वीकार करण्यात आला.
मार्च–मे 2020: कोविड-19 महामारीमुळे अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर फंड्सनी 'वेट अँड वॉच' भूमिका घेतली.
70 टक्के फंड्सकडून गेल्या 10 वर्षांत किमान एकदा कॅश कॉल
85 टक्के कॅश कॉल्स फक्त १-२ महिन्यांपर्यंतच मर्यादित.
केवळ 39 टक्के कॉल्स बाजारातील घसरणीच्या काळात
या रणनीतीचा बाजारातून फायदा घेण्यापेक्षा नुकसान टाळण्यासाठी वापर
बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही अल्प कालावधीसाठी टाइमिंगपेक्षा अधिक फायदेशीर ठरते. कॅश कॉल्स अस्थिरतेच्या काळात आपल्यासाठी छोडीशी ढाल ठरू शकते, ते दीर्घकालीन धोरणाला पर्याय ठरु शकत नाहीत.प्रणब उनीयाल, हेड एचडीएफसी ट्रस्ट
व्यावसायिक फंड मॅनेजर्सदेखील बाजारात टायमिंग साधण्याबाबत अचूक निर्णय घेऊ शकत नसतील तर वैयक्तिक गुंतवणूकदारांनी “कॅश कॉल्स”चा मोह टाळावा आणि आर्थिक उद्दिष्टांसाठी शिस्तबद्ध दीर्घकालीन गुंतवणूक धोरण योग्य ठरेल.ज्योती रॉय, इक्विटी स्पेशालिस्ट, एचडीएफसी