नाशिक : भोंदूबाबा नराधम अशोक एकनाथ खरात याने निर्लज्जतेचा कळस गाठल्याचे रविवारी (दि. 22) दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यांवरून समोर आले आहे. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण करताना गर्भवतीलादेखील आपल्या वासनेचे बळी पाडले आहे. सातव्या महिन्यात उत्तम संतती आणि पुत्रप्राप्तीसाठी पूजाविधी करण्याचा बनाव रचून त्याने या गर्भवतीचे शोषण केले; तर आणखी एका महिलेला गर्भवती करीत तिचा गर्भपात केला.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरुद्ध बलात्कारासह अन्य कलात्मान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या विरोधात आतापर्यंत बलात्काराचे तीन गुन्हे दाखल झाल्याने त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. सिन्नर तालुक्यातील श्री शिवानिका संस्थेचा अध्यक्ष अशोक खरात याला महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि. 18) अटक केली होती. शनिवारी (दि. 21) सात महिन्याच्या गर्भवतीच्या पतीसह अन्य एका पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत या नराधमाविरोधात फिर्यादी दिल्या आहेत.
एका फिर्यादीनुसार, पीडिता तिच्या पतीसोबत खरातकडे गेली होती. खरातनेच पीडितेच्या पतीला, तू तुझ्या पत्नीला ऑफिसमध्ये लगेच बोलावून घे, कारण सातव्या महिन्यात वाईट व दुष्ट शक्तीपासून गरोदर स्त्रीला खूप सांभाळावे लागते. मी एक विधी करेन, ज्यामुळे तुझ्या पत्नीवर दुष्ट शक्तीचा असर होणार नाही व तुझ्या बायकोची डिलिव्हरी सुरळीत होईल, तसेच त्या विधीमध्ये तुझ्या बायकोला मुलगाच होण्याकरिता मी विधी करेन, अशी बतावणी दिली. त्यानुसार फिर्यादी पती त्याच्या पत्नीला खरातकडे घेऊून गेला.
खरातने प्रारंभी दोघांनाही केबिनमध्ये बोलावले. त्यानंतर पतीला, मुलासाठी एक विधी करतो म्हणून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर खरातने गर्भवतीला डोळे बंद करण्यास सांगून मिठी मारत बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना ठार मारणार असल्याची धमकी दिली. दुसर्या पीडितेसोबत धार्मिक विधीच्या नावे शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केले. तसेच औषधी गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला, असा दमही भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.